Latest

Kolhapur : सिकंदर शेखने इराणच्या अली इराणीला दाखवले अस्मान

सोनाली जाधव

इचलकरंजी : पुढारी वृत्तसेवा, हजारो कुस्ती शौकिनांची उत्कंठा शिगेला पोहोचलेल्या व्यंकोबा मैदानात झालेल्या तुल्यबळ कुस्तीमध्ये गंगावेस तालमीचा 'भारत केसरी' पै. सिकंदर शेख याने इराणचा पै. अली इराणी याला समोरून झोळी डावावर अस्मान दाखवले आणि उपस्थित कुस्तीशौकिनांनी एकच जल्लोष केला. अवघ्या सहा मिनिटांच्या झालेल्या या कुस्तीने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. प्रथमच सहा महाराष्ट्र केसरी पैलवानांनी उपस्थित राहून मैदान गाजवले. (Kolhapur)

शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांच्या वाढदिवसानिमित्त व कोल्हापूर जिल्हा शहर राष्ट्रीय तालीम संघ आणि इचलकरंजी शहर तालीम संघाच्या मान्यतेने व्यंकोबा मैदानात निकाली कुस्त्यांचे मैदान झाले. पै. अमृत भोसले यांनी स्वागत केले. याप्रसंगी पालकमंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खा. धैर्यशील माने, आ. राजू आवळे, माजी आ. सुरेश हाळवणकर, आदिल फरास, मंगेश चव्हाण, विठ्ठल चोपडे, भाऊसो आवळे, रवींद्र लोहार, अविनाश बोनगे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

Kolhapur : सिकंदर शेखने इराणच्या अली इराणीला दाखवले अस्मान

मुख्य लढतीत पै. सिकंदर याने पहिल्यापासूनच आक्रमक होऊन पै. इराणी याच्यावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. पाचव्या मिनिटाला पै. सिकंदर याने बॅकथ—ोवर पै. इराणी याला उचलून टाकले आणि सिकंदरला विजयी घोषित करण्यात आले; पण उपस्थित प्रेक्षकांनी व पै. सिकंदर याने खिलाडूवृत्ती दाखवत निकाल अमान्य केला. यामुळे पुन्हा कुस्ती लावण्यात आली. त्यानंतर अवघ्या 47 सेकंदात समोरून झोळी डावावर पै. सिकंदर याने पै. इराणी याला चितपट केले. महिला गटात 'महाराष्ट्र केसरी' पै. अमृता पुजारी व महाराष्ट्र चॅम्पियन पै. ऋतुजा जाधव यांच्या मुख्य लढतीत अवघ्या काही मिनिटात समोरून झोळी डावावर पै. ऋतुजाला पै. अमृताने पराजित केले. पै. पूजा सासणे वि. पै. सिद्धी पाटील यांच्यातील लढतीत गडमुडशिंगीची पै. सिद्धी पाटील विजयी ठरली.

दुसर्‍या क्रमांकासाठी उपमहाराष्ट्र केसरी पै. किरण भगत याने पै. विकास काला याला चितपट करताच उपस्थित शौकिनांनी जल्लोष केला. 'महाराष्ट्र केसरी' पै. बाला रफिक वि. 'महाराष्ट्र केसरी' पै. हर्षवर्धन सदगीर यांच्यातील तृतीय क्रमांकाची कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली. 'महाराष्ट्र केसरी' पै. पृथ्वीराज पाटील विरुद्ध 'उत्तर महाराष्ट्र केसरी' पै. योगेश पवार यांच्यातील चौथ्या क्रमांकाच्या कुस्तीत पोकळ घिस्सा डावावर पृथ्वीराज याने योगेशला आस्मान दाखविले.
जोतिराम वाझे, सुकुमार माळी व प्रशांत चव्हाण यांनी निवेदन करून रंगत आणली. यावेळी रवी रजपुते, मोहन मालवणकर, पुंडलिक जाधव, प्रकाश पाटील, मनोज साळुंखे, उदयसिंग पाटील, अनिस म्हालदार आदींसह कुस्ती शौकिनांची मोठी गर्दी झाली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT