file photo 
Latest

Kolhapur Politics: भाजप सर्व पातळीवर अपयशी : आ. सतेज पाटील

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : भाजप सर्व पातळीवर अपयशी ठरल्यामुळेच मूलभूत प्रश्नांपासून लोकांना भरकटविण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. गेल्या नऊ वर्षांत गॅसचे दर वाढवून भाजप सरकारने 8 लाख 33 हजार कोटी लोकांच्या खिशातून काढून घेतले. उज्ज्वला योजनेच्या नावाखाली 68 हजार 702 कोटींची लूट केली. आता निवडणुकीच्या तोंडावर 200 रुपये कमी करून लोकांना फसविण्याचा धंदा भाजप करत आहे, असा घणाघाती आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. सतेज पाटील यांनी गुरुवारी पत्रकरांशी बोलताना केला. शहरात शनिवारी (दि.9) जनसंवाद यात्रा येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला एक वर्ष पूर्ण झाले. या यात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्वातंत्र्यानंतरची ही पहिलीच पदयात्रा आहे, असे सांगून आ. पाटील म्हणाले, भाजप आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा व ओबीसी यांच्यात वाद निर्माण करत आहे. जात आणि धर्माच्या नावाखाली फूट पाडणे ही भाजपची नीती आहे. आता ओबीसी आणि मराठा यांच्यामध्ये जाणीवपूर्वक वाद निर्माण करण्याची सरकारची चाल आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी 50 टक्केची अट शिथिल करण्याचा वटहुकूम काढण्याचे धाडस केंद्राने दाखवावे. लोकसभेच्या जागेसाठी काँग्रेस आग्रही आहे. परंतु याबाबतचा निर्णय पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरच होईल, असे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात सुरू असलेल्या जनसंवाद यात्रेस नागरिकांचा चांगला प्रतिसाद आहे. शहरामध्ये शनिवारी (दि.9) नवीन ही यात्रा काढण्यात येणार आहे. वाशी नाका येथून यात्रेला सुरुवात होईल. यामध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी आ. जयश्री जाधव उपस्थित होत्या.

गोकुळच्या बदनामीचे षड्यंत्र

प्रागतिक पक्षाने इंडियाला पाठिंबा दिला आहे. यासंदर्भात राजू शेट्टी यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगून आ. पाटील यांनी गोकुळला बदनाम करण्याचे षड्यंत्र विरोधकांकडून सुरू असल्याचे सांगितले.

105 आमदारांच्या भावना माहीत आहेत

मुख्यमंत्री व दोन उपमुखमंत्री या तिघांमध्ये अजूनही समन्वय नसल्याने त्यांचे राज्याकडे लक्ष नाही. दुष्काळाबाबत काही चर्चा करताना सरकार दिसत नाही. 105 आमदारवाल्यांच्या भावना आपणास माहीत आहेत. त्यांची अवस्था वाईट झाली आहे. सुरत व गुवाहाटीचा हिशेब मागितला असल्याचेही आ. पाटील यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT