कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची घोडदौड सुरू आहे. मुख्यमंत्री शिंदे यांचे कोल्हापूर जिल्ह्यावर विशेष असे लक्ष असून सर्व बालेकिल्ले पुन्हा काबीज करण्यासाठी शिवसेना सज्ज झाली आहे. 2024 ला दक्षिणोत्तर शिवसेनेचाच भगवा फडकेल, असे उद्गार राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी काढले. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मान्यवरांनी क्षीरसागर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
शिवसैनिकांच्या उत्साहाने व जल्लोषी वातावरणात क्षीरसागर यांचा वाढदिवस शुक्रवारी साजरा झाला. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या माजी कोषाध्यक्षा सौ. वैशाली क्षीरसागर, स्नुषा सौ. दिशा क्षीरसागर यांच्यासह भगिनींनी औक्षण केले. 'संघर्ष हीच माझी ओळख, जनतेच्या साथीने पुन्हा भगवा फडकविणार', असे क्षीरसागर यांनी स्पष्ट केले. शनिवार पेठेतील शिवालय या शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात क्षीरसागर यांच्यावर समर्थकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. दिवसभर शहरात ठिकठिकाणी विविध उपक्रम राबविण्यात आले.
दरम्यान, क्षीरसागर यांना विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोर्हे, युवा सेना अध्यक्ष खास. श्रीकांत शिंदे, उच्च व तंत्र मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, जलसंधारण मंत्री संजय राठोड, आरोग्य मंत्री तानाजी सावंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई आदांनी दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या. युवासेना अध्यक्ष ऋतुराज क्षीरसागर, युवानेते पुष्कराज क्षीरसागर, नातू कृष्णराज, आदिराज, शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, जिल्हाप्रमुख रवींद्र माने, शिवाजी जाधव, राहुल चव्हाण, नंदकुमार मोरे व इतर उपस्थित होते.
क्षीरसागर यांनी, कोल्हापूर महापालिका हद्दीत उत्तरसह दक्षिण मतदारसंघ आणि शहराला लागून असलेली गावेही आहेत. यापूर्वी आमदार या नात्याने कार्यरत असताना कोल्हापूर उत्तर विधानसभा कार्यक्षेत्रास प्राधान्य दिले, पण सध्या वाढलेली उपनगरे बहुतांश दक्षिण विधानसभा क्षेत्रात आहेत. तेथे मूलभूत सुविधांची वाणवा आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी दक्षिणच्या नागरिकांचा निव्वळ राजकारणासाठी उपयोग करून घेतला. त्यांच्या दुर्लक्षामुळेच दक्षिण मतदारसंघ भकास झाला. दक्षिणमधील नागरिकांच्या मागणीस मान देऊन त्याठिकाणी लक्ष केंद्रित केले. मतदारसंघाचा भेदभाव न ठेवता दक्षिण व उत्तर दोन्ही मतदारसंघात दक्षिणोत्तर विकास पर्वाची सुरुवात केली आहे.