कोल्हापूर : शिवसेना फुटून आता सव्वा वर्षे झाली, तरीही खरी शिवसेना कोणाची हा वाद सुरूच आहे. कोल्हापुरात तर हा वाद आता सण-उत्सवात गेला असून, तो आता थेट गणेश मंडपापर्यंत जाऊन पोहोचला आहे. खर्या शिवसेनेबरोबर आता खरे मंडळ कोणाचे, कोणी गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करायची, यावरून दोन्ही गटांत हायहोल्टेज ड्रामा झाला.
दोन्हीकडील कार्यकर्ते थेट रस्त्यावर उतरले. दोन्ही बाजूंनी एकमेकांची अबू्र वेशीवर टांगण्याचा प्रयत्न झाला. ऐन गणेशोत्सवात मांगल्याने आणि चैतन्याने भारलेल्या वातावरणात कोल्हापूरकरांनी मात्र, पोलिसांच्या गराड्यात शिवाजी चौक आणि बिंदू चौक परिसरात तणाव अनुभवला. खर्या शिवसेनेवरून आता धार्मिक कार्यक्रमातही अशी विघ्ने निर्माण होणार असतील, तर हा वाद आणखी काय काय बघायला लावेल, हे सांगणेही कठीण झाले आहे.
कोल्हापुरात फुटीचा वाद निवळण्याची चिन्हे नाहीत, याउलट दिवसेंदिवस तो अधिक चिघळले अशीच परिस्थिती आहे. शहराचा मध्यवर्ती भाग असलेल्या शिवाजी चौकातील संयुक्त शिवाजी चौक तरुण मंडळाच्या गणेशोत्सवाचे निमित्त दोन गटांतील वातावरण आणखी बिघडत चालले आहे. शिवसेना फुटली, दोन गट झाले, तसे शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या सार्वजनिक मंडळांचीही अवस्था झाली. अशीच अवस्था या मंडळाची झाली. मंडळही दोन गटांत विभागले गेले, आता गणेशोत्सवासाठी दोन्ही मंडळांचे दावे-प्रतिदावे सुरू झाले. दोन-तीन दिवस प्रयत्न करत पोलिसांनी हा वाद मिटवला. मात्र, एका गटाने मध्यरात्री मूर्ती आणून बसवली. यामुळे दुसर्या गटानेही मूर्ती बसवणार, असा पवित्रा घेतला.
मुख्यमंत्र्यांपासून थेट पालकमंत्र्यांच्या हस्तक्षेपामुळेच हे शक्य झाल्याचा आरोप ठाकरे गटाने करत, काहीही झाले तरी त्याच मंडळात आम्हीही मूर्ती बसवणार, असा इशारा दिल्याने गुरुवारी शहरातील वातावरण तणावपूर्ण बनले. अश्रुधुराच्या नळकाड्यांसह सशस्त्र पोलिस दल रस्त्यावर उतरले, ठिकठिकाणी बॅरेकेडिंग घालून रस्त्यावरील वाहतूक वळवण्यात आली. यामुळे ऐन गणेशोत्सवाच्या धामधुमीत कोल्हापुरात मात्र तणाव होता. ठाकरे गटाने पालखीतून मूर्ती आणत बिंदू चौकात ठिय्या मांडला, तर शिंदे गटाने मंडळाजवळ कोणी आले तर खैर नाही, जे होईल ते होईल, असा इशारा दिल्याने परिस्थिती जास्तच चिघळली. एकमेकांवर खालच्या पातळीवर जाऊन आरोप-प्रत्यारोप झाले.
पोलिस दोन्ही गटांची मनधरणी करत होते. मात्र, ऐकण्यास कोणीच तयार नव्हते. अखेर पाच तासांनी तोडगा निघाला. बाजूलाच नवा मंडप उभारला गेला, त्यात ठाकरे गटाच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना झाली आणि हा तणाव निवळला. मात्र, चार तास सुरू असलेल्या या ड्राम्यात गणेशाची विटबंना सहन करणार नाही, असे दोन्ही शिवसेनेकडून वारंवार सांगितले जात होते. मात्र, खरे मंडळ कोणाचे, खरी शिवसेना कोणाची, या वादात श्री गणेशाची एकप्रकारे विटंबनाच सुरू होती, असा सार्वत्रिक सूर कोल्हापूरकरांचा होता. चार तासांचा हा ड्रामा संपला; पण खर्या शिवसेनेवरून अजून वाद रंगेल, तो आणखी कोणत्या थराला जाईल, हे सांगणे कठीण होऊन बसले आहे. यामुळे गणरायानेच आता सर्वांना सद्बुद्धी द्यावी, असा सार्वत्रिक सूर आहे.