कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : ज्येष्ठ विचारवंत कॉ. गोविंद पानसरे हत्येचा तपास उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एसआयटीकडून एटीएसकडे वर्ग झाला आहे. त्यामुळे या खटल्याची सुनावणी नेमके कोणत्या अधिकार क्षेत्र असलेल्या न्यायालयात चालणार याची स्पष्टता संबंधित तपास यंत्रणांच्या अधिकार्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून द्यावी, असे निर्देश जिल्हा व सत्र न्यायालयाने मंगळवारी दिले. खटल्याची पुढील सुनावणी 6 सप्टेंबरला होणार आहे.
कॉ. पानसरे खून खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. तांबे यांच्या न्यायालयात सुरू आहे. पानसरे कुटुंबीयांनी केलेल्या मागणीनुसार खुनाचा तपास मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एसआयटीकडून एसटीएसकडे नुकताच वर्ग झाला आहे. त्यामुळे एटीएसचे विशेष न्यायालय मुंबईसह पुणे व सोलापूर येथे असल्याने कोल्हापूर येथील न्यायालयात खटल्याची सुनावणी होऊ शकते का? याबाबत नेमकी स्पष्टता तपास यंत्रणांकडून होणे आवश्यक आहे. असे विशेष सरकारी वकील अॅड. शिवाजीराव राणे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
एसआयटीसह एटीएसच्या वरिष्ठ अधिकार्यांना म्हणणे मांडण्यासाठी न्या. तांबे यांनी पाचारण केले. अॅड. राणे यांनी हे अधिकारी पोलिस महासंचालकांच्या मुंबई येथील बैठकीसाठी गेल्याचे सांगितले.
आरोपीचे वकील अॅड. समीर पटवर्धन यांनी खटल्याची नियमित सुनावणी सुरू असताना पानसरे कुटुंबीयांमार्फत वारंवार उच्च न्यायालयात धाव घेऊन तपास यंत्रणांसह न्यायालयीन कामांमध्येही अडथळे निर्माण केले आहेत. खुनाचा तपास एटीएसकडे वर्ग करण्याचा निर्णय होऊन तीन आठवड्यांचा कालावधी झाला आहे. त्यानंतरही दि. 20 ऑगस्टला उच्च न्यायालयात सुनावणी झाली. अधिकार क्षेत्राचा मुद्दा उपस्थित करून खटला पुन्हा प्रलंबित ठेवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे प्रदीर्घ काळ संशयित कारागृहात खितपत पडल्याचे सांगितले.
अधिकार क्षेत्राबाबत सरकारी पक्षाच्या वतीने उच्च न्यायालयाकडून मार्गदर्शन घेणे गरजेचे होते. मात्र ही कृती न करता तपास यंत्रणांमधील अधिकारीही मंगळवारी होणार्या सुनावणीसाठी न्यायालयात जाणीवपूर्वक अनुपस्थित राहिले आहेत. हा प्रकार गंभीर आहे. संबंधितांना कडक शब्दात समज देण्यात यावी, अशीही त्यांनी मागणी केली.
स्थानिक कारागृहात ठेवण्याची मुभा द्यावी : डॉ. तावडे
कॉ. पानसरे हत्येतील संशयित डॉ. वीरेंद्र तावडे यांनी न्यायाधीशांसमोर कैफियत मांडली. वयोमानामुळे प्रकृतीचा त्रास आहे. खटला सुनावणीसाठी प्रत्येकवेळी कोल्हापूरला आणले जाते. सुनावणीला कोल्हापूरला आणल्यास तातडीने पुण्याला न हलविता किमान दोन दिवस येथील स्थानिक कारागृहात ठेवण्याची मुभा मिळावी, असे तावडे म्हणाले.
साडेचार वाजता आरोपी न्यायालयात
पानसरे खटल्यातील संशयित बंगळूर व पुण्यातील कारागृहात बंदिस्त आहेत. लांबपल्ल्याच्या प्रवासामुळे कोल्हापुरात आणण्यास उशीर झाल्याने त्यांना सायंकाळी साडेचार वाजता न्यायालयात हजर करण्यात आले.
समीरला सल्ला… पुढील रविवारी 'एसआयटी'कडे येऊ नकोस!
संशयित समीर गायकवाड याला यापूर्वीच जामीन मिळाला आहे. रविवारी समीर एसआयटीमध्ये हजेरीसाठी गेला असता, तपास 'एटीएस'कडे वर्ग झाल्याने पुढील रविवारी एसआयटीकडे येऊ नकोस, असा सल्ला त्याला देण्यात आला आहे. अॅड. समीर पटवर्धन यांनी ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. हजेरी कोठे द्यावी, याबाबत मार्गदर्शन व्हावे, अशी त्यांनी विनंती केली.
न्यायालयाच्या आवारात पोलिसांशी हुज्जत!
अॅड. पटवर्धन यांनी आरोपींचे काही नातेवाईक आले आहेत. त्यांची भेट घेण्याची इच्छा आहे. परवानगी मिळावी, अशी मागणी केली. न्या. तांबे यांनी विनंती फेटाळली. मात्र संशयित आरोपींना न्यायालयाबाहेर आणल्यानंतर नातेवाईकांनी त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना हुसकावून लावले असता, नातेवाईक महिलांनी वादावादी करून हुज्जत घातली.