कोल्हापूर ; चंद्रशेखर माताडे : कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक (Kolhapur North by-election) जाहीर झाली असून काँग्रेस विरुद्ध भाजप असा टोकाचा संघर्ष होणार आहे. शिवसेनेचा उमेदवार उभारणार का? याचा निर्णय अद्याप झालेला नाही. मात्र यानिमित्ताने जिल्ह्यात मोठी राजकीय लढाई होणार आहे.
चंद्रकांत जाधव यांच्या अकाली निधनामुळे पोटनिवडणूक होत आहे. जाधव हे काँग्रेसचे आमदार होते. निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडी सत्तेवर आली. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस असे तिन्ही पक्ष आघाडीत एकत्र आहेत. मात्र कोल्हापूर जिल्ह्यात आघाडीत बिघाडी होण्याची चिन्हे आहेत. शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी जाहीरपणे ही पोटनिवडणूक लढविण्याची भूमिका वारंवार मांडली. यावर राष्ट्रवादीने शिवसेनेला लढू द्या, अशी भूमिका घेतली. आता शिवसेना काय करणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
काँग्रेसने चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी श्रीमती जयश्री जाधव यांना उमेदवारी देण्याचे निश्चित केले आहे. भाजपकडून सत्यजित कदम निवडणूक लढविणार असल्याचे संकेत आहेत. त्यांनी प्रचारही सुरू केला आहे. चार राज्यांतील यशामुळे भाजपमध्ये उत्साह आहे. तर पंजाबमधील यशाच्या पार्श्वभूमीवर आपही या निवडणुकीत उतरणार आहे. शिवसेनेची भूमिका अद्याप अस्पष्ट आहे.
आपल्याला कटकारस्थान करून पाडल्याचा आरोप राजेश क्षीरसागर यांनी केला होता. त्यांना आता पक्ष निवडणूक रिंगणात उतरविणार का याची चर्चा आहे. भाजपची मदार महाडिक गटाच्या ताकदीवर आहे. जयश्री जाधव यांच्या उमेदवारीसाठी पालकमंत्री सतेज पाटील व हसन मुश्रीफ यांनी सुरुवातीपासून आग्रही भूमिका घेतली आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांची ताकद जाधव यांच्या मागे असेल. सत्यजित कदम यांच्यामागे महाडिक कुटुंबाची पूर्ण ताकद असणार आहे. त्यामुळे हा संघर्ष टोकाचा होणार आहे.
रणधुमाळी सुरू (Kolhapur North by-election)
निवडणुकीची रणधुमाळी आता सुरू झाली आहे. प्रत्येक पक्षाला आपण नेमके कोठे आहोत याचा अंदाज यातून येणार आहे. हा अंदाज त्यांना महापालिकेसाठी उपयोगी ठरणार आहे. त्याचबरोबर भागाभागातील कार्यकर्ते विविध पक्षांकडून इच्छुक असून त्यांनाही ताकद आजमावयाची संधी मिळणार आहे. तर नेत्यांनाही तिकिटाच्या हमीवर कार्यकर्त्यांना बळ देता येणार आहे.