कोल्हापूर ; सतीश सरीकर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर होण्यापूर्वीच रणधुमाळी सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात निवडणूक बिनविरोध होईल, असे वाटत असतानाच हळूहळू निवडणुकीमध्ये चुरस निर्माण झाली आहे. काँग्रेसकडून श्रीमती जयश्री जाधव यांच्या उमेदवारीच्या घोषणेची औपचारिकता बाकी आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीकडून निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न सुरू असला, तरी भाजपने दंड थोपटल्याने निवडणूक होणार हे जवळपास निश्चित आहे. भाजप मैदानात उतरल्यास शिवसेनाही मैदानात उतरणार हेही स्पष्ट आहे. कारण, कोल्हापूर उत्तर हा अपवाद वगळता शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे.
शिवसेनेला पोटनिवडणुकीत तटस्थ राहणे राजकीयदृष्ट्या परवडणारे नाही. अन्यथा महाविकास आघाडीअतंर्गत या मतदारसंघावर काँग्रेस कायमस्वरूपी हक्क सांगेल, आणि बालेकिल्ला कायमचा गमावला जाईल, अशी भीती आहे. त्यामुळे कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुुकीत काँग्रेस, भाजप, शिवसेनेबरोबरच आप, दलित पँथर तसेच काही अपक्षही आपले नशीब आजमाविणार आहेत.
काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन झाल्याने कोल्हापूर उत्तर मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. महाविकास आघाडीच्या फॉर्म्युल्यानुसार ही जागा काँग्रेसला मिळावी, अशी मागणी पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली आहे. तसेच निवडणूक बिनविरोध होण्यासाठीही त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. भाजप नेते व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या ते भेटी घेणार आहेत. परंतु, भाजपने तत्पूर्वी उमेदवार निश्चितीसाठी समिती नियुक्त केली आहे. शहरात खासगी एजन्सीकडून सर्वेक्षणाद्वारे मातब्बर उमेदवारांबाबत चाचपणीही केली आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवडणुका स्वबळावर लढा आणि जिंकण्यासाठी लढा, असे आवाहन शिवसैनिकांना केले. त्यामुळे कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक शिवसेना लढविणार, अशी चर्चा सुरू झाली होती. परंतु, निवडणुकीबाबत शिवसेनेत 'मातोश्री'वर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे कोल्हापूर उत्तरची जागा शिवसेना लढणार की महाविकास आघाडीतील काँग्रेसला सोडणार, याकडे शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे.
गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील गोकुळसह इतर निवडणुका महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली लढल्या गेल्या. परंतु, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांना स्वीकृत संचालक म्हणून घेण्यास सांगूनही काँग्रेसचे नेते पालकमंत्री सतेज पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्याविषयी शिवसेनेने थेट गोकुळच्या दारात आंदोलने केली, तरीही मंत्री पाटील व मुश्रीफ यांनी त्याकडे गांभीर्याने पाहिले नाही. नुकत्याच झालेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत शिवसेनेची भलावण केली.
काँग्रेस व राष्ट्रवादीने थेट भाजपसोबत आघाडी केली. त्यामुळे शिवसेनेला आपले अस्तित्व टिकविण्यासाठी विरोधात शड्डू ठोकावा लागला. शिवसेनेचे खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी चांगली टक्कर दिली. त्यानंतर महाविकास आघाडीच्या राजकारणात बिघाडी झाल्याचे चित्र आहे. शिवसेनेला गृहित धरून निर्णय घेतले जात असल्याने शिवसेना ही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मागे फरफटत जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. परिणामी, शिवसेना पारंपरिक बालेकिल्ला काँग्रेसच्या ताब्यात देणार का, अशी चर्चा सुरू आहे.
भाजपने खासगी एजन्सीकडून सर्व्हे करून घेतला आहे. माजी नगरसेवक सत्यजित कदम, जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव, माजी नगरसेवक अजित ठाणेकर, माणिक पाटील-चुयेकर इच्छुक आहेत. परंतु, कदम यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडण्याची दाट शक्यता आहे. पोटनिवडणूक जाहीर झालेल्या दिवशीच कदम यांच्या नावाची घोषणा भाजपकडून होईल, असे सांगण्यात येते.
शिवसेनेचे अस्तित्वच संपण्याचा धोका!
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. 1990 पासून या मतदारसंघावर शिवसेनेचे वर्चस्व आहे. 1995 व 1999 असा दोनवेळा सुरेश साळोखे यांनी शिवसेनेतून लढून विजय मिळवला. 2004 मध्ये राष्ट्रवादीतून एका रात्रीत काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या मालोजीराजे यांच्याकडून साळोखे यांचा पराभव झाला.
2009 मध्ये मात्र राजेश क्षीरसागर यांना शिवसेनेचे उमेदवारी मिळाली. क्षीरसागर यांनी मालोजीराजे यांचा पराभव करून हा मतदारसंघ पुन्हा खेचून घेऊन शिवसेनेचा भगवा फडकविला. 2014 मध्येही क्षीरसागर यांनी विजय मिळवून हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचे दाखविले.
2019 मध्ये मात्र मूळचे भाजपवासी असलेल्या चंद्रकांत जाधव यांनी काँग्रेसमधून लढून क्षीरसागर यांचा पराभव केला. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असल्याने काँग्रेसने मतदारसंघावर हक्क सांगितला आहे. तसे झाल्यास हा मतदारसंघ कायमस्वरूपी काँग्रेसच्या ताब्यात जाईल आणि शिवसेनेचे अस्तित्वच संपेल, असा धोका शिवसैनिकांतून व्यक्त केला जात आहे.
निवडणूक लढविणार : राजेश क्षीरसागर
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. गेल्या निवडणुकीत पराभव झाला असला, तरी दुसर्या दिवसापासूनच पुन्हा सामाजिक कामाला लागलो. गेल्या दोन वर्षांत पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून कोल्हापुरातील विकासकामांसाठी कोट्यवधींचा निधी आणला आहे.
शिवसेनेने पोटनिवडणूक लढवावी, असा कार्यकर्त्यांचा प्रचंड दबाव आहे. रणांगणात उतरण्याची तयारीही केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाची वाट पाहत आहे. 'मातोश्री'वरून निर्णय आल्यास शिवसैनिक झपाटून कामाला लागतील, असे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.