कोल्हापूर : देशात यंदा मान्सूनचे समाधानकारक बरसण्याचे वर्तमान आल्यामुळे भारतीय उपखंडाला मोठा दिलासा मिळाला असला, तरी एप्रिलच्या पूर्वसंध्येलाच उन्हाचे भाजून काढणे सुरू झाले आहे. देशातील बहुतेक शहरांमध्ये तापमानाने चाळिशी पार करतानाच जलसाठे प्रथमच गेल्या 10 वर्षांतील सरासरीहून 20 टक्क्यांनी खाली गेले आहेत. (Kolhapur News)
महाराष्ट्रात गतवर्षीच्या तुलनेत जलसाठ्याचे प्रमाण 28 टक्क्यांनी घसरले आहे. यामुळे उत्तरेकडे बिहार आणि दक्षिणेत आंध्र व तेलंगणात नागरिकांना आतापासूनच पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागेल. शिवाय, महाराष्ट्रात जलसंकटापासून दूर राहण्याकरिता नागरिकांना पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करावा लागणार आहे.
केंद्रीय जलआयोगाकडे उपलब्ध असलेल्या देशातील धरणांमधील पाणीसाठ्यांच्या आकडेवारीनुसार एकूण 10 वर्षांच्या सरासरीपेक्षा 29 टक्के पाणीसाठा घसरला आहे. देशात एकूण 70 टक्के पाणीसाठा क्षमता असलेल्या 150 धरणांमधील पाण्याची ही स्थिती आहे. पाणीटंचाईचा सर्वाधिक 41.4 टक्क्यांचा चटका दक्षिण भारताला आहे. उत्तरेकडे सरासरीपेक्षा 12.9 टक्के पाणीसाठा कमी आहे. पश्चिम भारतामध्ये गतवर्षीच्या तुलनेत पाणीसाठा सरासरीच्या 15.8 टक्क्यांनी खाली गेला आहे, तर मध्य भारतात 4.3 टक्क्यांनी पाणीसाठा घसरला असताना पूर्वोत्तरीय भागात मात्र पाणीसाठा गतवर्षीच्या तुलनेत 13.3 टक्क्यांनी अधिक आहे.
कडक उन्हाळ्याची चाहूल लागताच श्रीमंत, पांढरपेशी, नोकरदार थंड हवेच्या ठिकाणांकडे धाव घेतात. आता या ठिकाणीही तापमान 30 डिग्री सेंटिग्रेडवर पोहोचल्याने तेथेही वातानुकूलन यंत्रणेशिवाय राहणे मुश्किल होऊन बसले आहे. देशात दिवसा उन्हाने नागरिकांच्या अंगाची लाही लाही करण्यास सुरुवात केली आहे.
नागरिकांना या बेचैनीतून सायंकाळी व रात्री उशिरा थोडा थंड हवेचा शिडकावा दिलासा देतो; परंतु भारतीय हवामान खात्याने रात्रीच्या सरासरी तापमानातही वाढ होण्याची शक्यता वर्तविली असल्याने नागरिकांना या कठीण काळाशी सामना करावा लागणार आहे.