Latest

राजर्षी शाहूंच्या दूरद‍ृष्टीचे जिवंत स्मारक; कोल्हापूर-मिरज रेल्वे मार्ग

सोनाली जाधव

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
'कोल्हापूरचे आगगाडीचे काम तडीस गेल्याने माझ्या राज्याच्या संपत्तीची साधने वाढण्याच्या कामी याचा फायदेशीर परिणाम होईल'… हे उद‍्गार होते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे! आजपासून 134 वर्षांपूर्वी पाहिलेली ही दूरद‍ृष्टी, लोकराजा शाहूंच्या विकासाचा द‍ृष्टिकोन किती समृद्ध आणि व्यापक होता, याची आजही साक्ष देत आहे.

3 मे 1888 रोजी कोल्हापूर-मिरज या रेल्वेमार्गाच्या बांधकामाचा शुभारंभ झाला. शाहू महाराज यांनी चांदीच्या फावड्याने (खोर्‍याने) या मार्गासाठी पहिले ढेकूळ खोदले. यानंतर सुरू झालेला मार्ग आजही कोल्हापूरच्या विकासात मोलाचे योगदान देत आहे. वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी या मार्गाच्या भूमिपूजनानिमित्त शाहू महाराज पहिल्याच लोकांशी संबंधित अशा कार्यक्रमात सहभागी झाले आणि करवीर नगरीला भविष्याचा वेध घेणारा विकासाचा द्रष्टा संकल्पक मिळाला. राजर्षी शाहूृंनी या कार्यक्रमप्रसंगी काढलेल्या उद‍्गारांत विकासाचा ध्यास होता, 134 वर्षांनंतरही शाहूंचे उद‍्गार तितकेच परिणामकारक असल्याचे दिसत आहे.

तत्कालीन संस्थानने मुंबई सरकारकडे 1879 साली कोल्हापूर-मिरज या 48 किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गासाठी मंजुरी मागितली होती. ही मंजुरी मिळाल्यानंतर 1880 साली या मार्गासाठी 'ग्रेट इंडियन पेनिन्सूला रेल्वे'च्या वतीने सर्वेक्षण करण्यात आले. यानंतर सुमारे आठ वर्षांनी 3 मे 1888 रोजी या रेल्वे मार्गाचे काम सुरू झाले. 'हे काम तीन वर्षांत तडीस नेले जाईल', अशी ग्वाही राजर्षी शाहूंनी दिली होती.
पंचगंगा आणि कृष्णा नदीवरील दोन मोठे पूल, हातकणंगलेनजीक ओढ्यावरील मोठा पूल आणि सुमारे 75 लहान-मोठ्या मोर्‍या असा हा खडतर मार्ग. सुमारे 134 वर्षांपूर्वी उपलब्ध तंत्रज्ञान, साधनसामग्री, कुशल मनुष्यबळ याचा विचार करता या मार्गाचे काम तीन वर्षांतच (दोन वर्षे 352 दिवस) पूर्ण करण्यात आले.

आजच्या काळातही इतक्या कमी वेळेत 48 किलोमीटरचा मार्ग उभारून त्यावरून वाहतूक सुरू करणे ही गोष्ट अशक्य अशीच आहे. मात्र, विकासाच्या ध्येयाने, आपल्या जनतेच्या सुख-सोयीचा, प्रगतीचाच विचार करणारे लोक काय करू शकतात याचेच हा मार्ग म्हणजे जिवंत उदाहरण म्हणावे लागेल. 20 एप्रिल 1891 रोजी या मार्गावरून सायंकाळी थाटामाटात मिरजेच्या दिशेने पहिली गाडी धावली आणि कोल्हापूरच्या विकासाच्या समृद्धीची तीच खरी नांदी ठरली.

द‍ृष्टिक्षेपात कोल्हापूर-मिरज मार्ग

1879- रेल्वे मार्गासाठी मागणी
1880- रेल्वे मार्गासाठी सर्वेक्षण
1888- रेल्वे मार्गाचे काम सुरू
1891- रेल्वे मार्ग सुरू
1961- ब्रॉडगेज कामाला प्रारंभ
1971- ब्रॉडगेज वरून पहिली रेल्वे
2020- विद्युतीकरण पूर्ण

द‍ृष्टिक्षेपात कोल्हापूर स्थानक

रेल्वे स्थानकावरील गाड्यांची ये-जा – 28
एक्स्प्रेस गाड्या – 9
पॅसेंजर गाड्या – 5
आठवड्यातून एक वेळा धावणार्‍या -3
आठवड्यातून दोन वेळा धावणार्‍या – 2
सुपरफास्ट गाड्या – 1
एकूण प्लॅटफार्म – 3

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT