जाधववाडी : जे पाच वर्षे स्वतःच कुंभकर्णी झोपेत होते, ते खासदार बाजार समितीमधील व्यापारी, शेतकरी, हमाल, तोलाईदार यांचे प्रश्न काय सोडवणार? असा टोला आमदार सतेज पाटील यांनी खासदार संजय मंडलिक यांना नाव न घेता लगावला. कोल्हापूर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज यांच्या प्रचारार्थ बाजार समिती येथे प्रचार सभेत ते बोलत होते.
आ. पाटील म्हणाले, पाच वर्षांतील बाजार समितीचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केला जाईल. गेल्या दहा वर्षांत समाजातील सलोखा, बंधुभाव बिघडवण्याचे काम भाजपने केले आहे. त्यामुळे आता मोदींच्या बोगस, भूलभुलैय्या घोषणांना बळी पडू नका. बाजार समितीचे सभापती भारत पाटील-भुयेकर म्हणाले, राजर्षी शाहू छत्रपतींच्या उपकारांची जाणीव म्हणून व्यापारी, शेतकरी, हमाल, तोलाईदार शाहू महाराजांना मताधिक्य देतील. भाजीपाला असोसिएशनचे अध्यक्ष जमीर बागवान, कुमार अहुजा, यासीन बागवान यांनीही मनोगत व्यक्त केले. संभाजी पाटील, सुयोग वाडकर, अशोक आहुजा, दत्ताजीराव वारके, नीलेश पटेल, अतुल शहा, विक्रम खाडे, शिवगोंडा सदलगे, धान्य व्यापारी वैभव सावर्डेकर, नहीम बागवान, गणी आजरेकर, विजय कागले, किरण तपकिरे, महेश वारके आदी उपस्थित होते.
दरम्यान, भुदरगड तालुक्यात शेतकरी हित जोपासणाऱ्या शाहू महाराजांच्या उमेदवारीने भुदरगड तालुक्यातील जनतेत उत्साह ओसंडून वाहत आहे. शाहू महाराज यांना विजयी करण्यासाठी एकवटलेली या तालुक्यातील जनता आगामी लोकसभा निवडणुकीत इतिहास घडवणार आहे, असा विश्वास भुदरगड तालुका काँग्रेसचे अध्यक्ष शामराव देसाई यांनी व्यक्त केला.
शाहू महाराज यांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीच्या मडूर, शेळोली, सोनारवाडी येथील संपर्क दौऱ्यात ते बोलत होते. यावेळी बाजार समितीचे माजी संचालक सचिन घोरपडे, प्रकाश पाटील, एस. एम. पाटील, जीवन पाटील उपस्थित होते. यावेळी 'गोकुळ'चे माजी संचालक दिनकरराव कांबळे, सुरेश नाईक, राजू काझी, सुधीर वर्णे, मोहन शिंदे, नितीन बोटे, अमर बरकाळे, प्रताप वारके वा कार्यकर्ते उपस्थित होते.