गडकोट  
Latest

कोल्हापूर : ‘पुरातत्त्व’कडे चारच गडकोट; केंद्राकडे एक, तर राज्‍याकडे तीन किल्‍ल्‍यांची नोंद

backup backup

कोल्हापूर; सागर यादव : छत्रपतींची राजधानी असणार्‍या कोल्हापूर जिल्ह्यात 13 गडकोट-किल्ले असताना पुरातत्त्व विभागाकडे केवळ चारच गडकोटांची नोंद आहे. यात पन्हाळगड केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडे, तर विशाळगड, रांगणा व भुदरगड राज्य पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत आहेत. उर्वरित गडकोटांपैकी काही गडकोट वन विभागाच्या हद्दीत असून, इतर गडकोटांना कोणीवाली नसल्याने त्यावर अतिक्रमणाला रान मोकळेच आहे.

प्रतापगडाच्या पायथ्याशी असणार्‍या अफजलखानाच्या कबर परिसरातील अतिक्रमण काढल्यानंतर राज्यातील सर्वच गडकोटांवरील अतिक्रमणांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावर सध्या अतिक्रमण निर्मूलन मोहीम सुरू आहे. मात्र, इतर गडकोटांना वाली नसल्याने त्यावर विविध प्रकारचे अतिक्रमण सुरूच असल्याचे वास्तव आहे. यामुळे या गडकोटांचा इतिहास व गडपण हरवत चालले आहे. भविष्यात अतिक्रमणांना भयावह रूप प्राप्त होऊ शकते. ते रोखण्यासाठी तातडीने प्रयत्न होणे अत्यावश्यक आहे. यासाठी शासनाच्या पुरातत्त्व विभागाने गडकोट आपल्या अखत्यारीत घेऊन त्यांच्या जतन-संवर्धन-संरक्षणाचे काम हाती घेणे काळाची गरज आहे.

जिल्ह्यातील गडकोटांकडे पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. शासनाकडून संवर्धनासाठी मिळणारा प्रचंड पैसा अनावश्यक बांधकामांवर खर्च केला जात आहे. चुकीची कामे करणार्‍यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. त्यामुळे अधिकारी व कॉन्ट्रॅक्टर्सचा मनमानी कारभार सुरू असतो.
– इंद्रजित सावंत, इतिहास अभ्यासक

विशाळगडाप्रमाणेच जिल्ह्यातील विविध गडकोटांवर कमी-अधिक फरकाने विविध प्रकारचे अतिक्रमण झालेले आहे. कोणत्याही गडावर पुरातत्त्वीय सूचना व नियमावलींचा अवलंब होत नसल्याचे वास्तव आहे. केवळ चारच गडकोट पुरातत्त्वकडे असल्याने इतर गडकोटांवर अतिक्रमणासाठी रान रिकामे आहे.
– भगवान चिले, दुर्ग अभ्यासक

कोल्हापूर जिल्ह्यातील दुर्गवैभव

पन्हाळगड, पावनगड व मुडागड (ता. पन्हाळा), विशाळगड (ता. शाहूवाडी), भुदरगड व रांगणागड (ता. भुदरगड), गगनगड (ता. गगनबावडा), पारगड, गंधर्वगड, महिपालगड, कलानिधीगड (ता. चंदगड), सामानगड (ता. गडहिंग्लज), शिवगड (ता. राधानगरी).

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT