कोल्हापूर : शहराच्या हददवाढ मागणीसाठी कोल्हापूर शहर सर्वपक्षीय हद्दवाढ समन्वय व कृती समितीतर्फे रस्त्यावरील लढाईचा प्रारंभ म्हणून महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.  
Latest

कोल्हापूर जिल्ह्यात 3 मंत्री; तरीही हद्दवाढ का रखडली?

Arun Patil

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीची जनतेची अनेक वर्षांची मागणी आहे. जिल्ह्यात सध्या तीन मंत्री आहेत. तरीही हद्दवाढ का होत नाही, असा सवाल कोल्हापूर शहर सर्वपक्षीय हद्दवाढ समन्वय व कृती समिती सदस्?यांनी व्यक्त केला. समितीतर्फे हद्दवाढीच्या मागणीसाठी गुरुवारी महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन करून रस्त्यावरील लढाई सुरू करण्यात आली.

राज्याचे नगरविकास मंत्री हद्दवाढीचा प्रस्ताव मागवून घेतात. पण जिल्ह्यातील मंत्र्यांना याचे देणे-घेणे नाही, असेही त्यांनी सांगितले.
गेली अनेक वर्षे हद्दवाढीसाठी आंदोलन सुरू आहे. राज्यकर्ते याबाबत गंभीर नसल्याने आता रस्त्यावरील लढाई करावी लागत असल्याचे निमंत्रक माजी महापौर आर. के. पोवार यांनी सांगितले.

हद्दवाढीला विरोध हा विकासाच्या मार्गातला मोठा अडसर आहे. मंत्र्यांनी आपल्याच शहराच्या हद्दवाढीकडे दुर्लक्ष केले आहे. काही ठराविक नेत्यांमुळेच ही हद्दवाढ रखडल्याचे बाबा पार्टे म्हणाले.

पुणे, सांगलीसह अन्य शहरांची हद्दवाढ होते. कोल्हापूरची हद्दवाढ होत नाही. त्यामुळे कोल्हापुरातील आंदोलनाबरोबर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली पाहिजे. हद्दवाढीसाठी राजकीय इच्छाशक्‍ती हवी, असे माजी महापौर सुनील कदम यांनी सांगितले.

हद्दवाढ ही केवळ महापालिकेचे उत्पन्न वाढवण्यासाठी नाही तर जनतेचे दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी आहे. नवे उद्योग आले, व्यवसाय वाढला तरच रोजगार वाढेल. म्हणून हद्दवाढीच्या आंदोलनाला सर्व व्यावसायिक संस्था, उद्योजकांच्या संघटना यांचा पाठिंबा असल्याचे चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांनी सांगितले.

'आधी हद्दवाढ, मगच निवडणूक' ही आमची रास्त मागणी आहे. हद्दवाढीसाठी रस्त्यावरच्या संघर्षाला पर्याय नसल्याचे अ‍ॅड. बाबा इंदुलकर म्हणाले.

आगामी विधानसभा अधिवेशनात जिल्ह्यातील मंत्री आणि आमदारांनी हद्दवाढीची भूमिका मांडली पाहीजे, किशोर घाटगे म्हणाले.
निवडणूक लादली तरी राजकीय पक्षांनी ही निवडणूक लढवू नयेे असे आवाहन अनिल घाटगे यांनी केले.

हद्दवाढ होणे हीच प्रा. एन. डी. पाटील यांना खरी श्रद्धांजली असेल. निवडणुकांवर बहिष्कार टाकण्यापेक्षा हद्दवाढ कृती समितीनेच हा मुद्दा घेऊन निवडणूक लढवावी सत्ता मिळवून हद्दवाढ करावी, अशी सूचना सतीशचंद्र कांबळे यांनी केली.

या आंदोलनात माजी नगरसेवक सत्यजित कदम, अशोक भंडारे, सुभाष देसाई, संदीप देसाई, दुर्गेश लिंग्रस, क्रिडाईचे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर, माणिक पाटील चुयेकर, हॉटेल मालक संघाचे अध्यक्ष उज्ज्वल नागेशकर, सचिव सिद्धार्थ लाटकर, उपाध्यक्ष सचिन शानबाग, अरुण चोपदार, दिलीप मैत्राणी, वैशाली महाडिक, महादेव पाटील यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT