कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा करवीरनिवासिनी अंबाबाई देवीच्या गाभार्यातील अतितातडीच्या संवर्धन कामामुळे रविवारी (दि. 18) देवीचे दर्शन भाविकांसाठी बंद करण्यात आले होते. केंद्र व राज्य पुरातत्त्व विभागाच्या वतीने दिवसभर हे काम सुरू होते. यामुळे भाविकांना दर्शनासाठी पितळी उंबर्याजवळ उत्सवमूर्ती ठेवण्यात आली होती. याच मूर्तीचे दर्शन भाविकांनी घेतले. दरम्यान, रविवार असल्याने मंदिरात दिवसभर भाविकांची मोठी गर्दी झाली होती. पुरातत्त्व विभागाच्या संवर्धन कामाबद्दल पाळण्यात आलेल्या गुप्ततेची चर्चा सुरू होती.
नवरात्रौत्सव अवघ्या आठवड्यावर आला असून, याची जय्यत तयारी सर्वत्र सुरू आहे. देवस्थान समितीच्या वतीने अंबाबाई मंदिरात विविध कामे सुरू आहेत. अशातच रविवारी केंद्र व राज्य पुरातत्त्व विभागाच्या सूचनेनुसार गाभार्यातील अतितातडीचे संवर्धन काम सुरू करण्यात आले. सकाळी देवस्थान समितीचे अध्यक्ष व जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी मंदिरात भेट देऊन पाहणी करून विविध सूचना केल्या.
मात्र, मंदिराच्या गाभार्यात सुरू असणारे संवर्धन काम आणि पुरातत्त्व विभागाच्या अधिकार्यांनी केलेल्या पाहणीबद्दल कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आली नाही. एकीकडे गाभार्यात काम सुरू असतानाही, दुसरीकडे देवस्थान समितीच्या पदाधिकार्यांकडून पुरातत्त्वचे लोक आलेले नाहीत, पाहणी पूर्वीच झाली आहे, आज पाहणी होणार नाही, अहवाल आल्यानंतर माहिती देऊ, अशी उत्तरे देण्यात आली. यामुळे मंदिराच्या गाभार्यात सुरू असणारे अतितातडीचे संवर्धन काम नेमके काय? याबद्दलची उत्सुकता अधिकच वाढली आहे. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत हे काम सुरूच होते. देवस्थान समितीकडून याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही.