कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : अंबाबाई मंदिर कॉरिडॉर निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यासाठी मंदिराच्या चारही बाजूच्या जागा संपादनाबाबत देवस्थान समिती चाचपणी करत आहेत. दरम्यान, भूसंपादनासाठी पाठवलेल्या पत्रावर संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत असून नेमके चित्र दोन मार्चनंतरच स्पष्ट होणार आहे.
अंबाबाई मंदिराभोवतीच्या जागा संपादनासाठी संमती देण्याबाबत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने सुमारे दोनशेहून अधिक मालमत्ताधारकांना पत्रे दिली आहेत. दोन मार्चपर्यंत संबंधितांनी जागा देण्यास संमती असल्यास तसे लेखी कळवावे, असे आवाहन या पत्रात केले आहे. या पत्रावर मालमत्ताधारकांतून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
भाविकांना सुविधा देण्यासाठी आणि भविष्याचा विचार करून मंदिराभोवती जागा संपादित करण्याचा विचार सुरू आहे. ही जागा प्रस्तावित अंबाबाई मंदिर कॉरिडॉर आराखड्यानुसार संपादित करण्याबाबतची चाचपणी केली जात आहे.
यामुळे लवकरच अंबाबाई मंदिर कॉॅरिडॉर होण्याची शक्यता आहे. या कॉॅरिडॉरला विरोध नाही. मात्र, त्याचे नेमके स्वरूप स्पष्ट करावे, जे विस्थापित होणार आहेत, त्यांचे याच कॉॅरिडॉरमध्ये कशा प्रकारे पुनर्वसन करता येईल, त्यासाठी सकारात्मक प्रयत्न व्हावेत, असा सूर काही मालमत्ताधारक व्यक्त करत आहेत.
मुळात देवस्थानला असे पत्र देण्याचा अधिकार आहे का, असा सवालही काही मालमत्ताधारकांनी उपस्थित केला. यामागील नेमका हेतू स्पष्ट करावा. अगोदर देवस्थानच्या तसेच शासकीय ज्या ज्या जागा मंदिराजवळ उपलब्ध आहेत, त्या ठिकाणी आवश्यक सुविधा चांगल्या प्रकारे उपलब्ध करून द्याव्यात, त्यानंतर ही कार्यवाही करावी, असेही काही मालमत्ताधारकांचे म्हणणे आहे.
शहराचा मध्यवर्ती भाग असलेल्या महाद्वार रोडवरील रेडिरेकनरच्या दरात वाढ होत नाही, त्याच वेळी शहरातील अन्य भागात ही वाढ वेगाने होत आहे, हे जाणीवपूर्वक केले जात आहे का, असाही सवाल काहींनी उपस्थित केला.
देवस्थान समितीच्या पत्रांवर काही निवासी मालमत्ताधारकांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. योग्य मूल्यांकन, एकरकमी आणि रोख स्वरूपात मोबदला दिला जात असेल तर याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ, असे त्यांनी सांगितले. सध्याच्या जागेेत राहणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. वाहतुकीची समस्या आहे, वाहन पार्किंगची अडचण आहे. नव्याने बांधकाम करताना, दैनंदिन व्यवहारात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे काहीजणांनी जागा देण्याची तयारी दाखवली आहे.