कुरुंदवाड; पुढारी वृत्तसेवा : गणेशवाडी (ता. शिरोळ ) येथे कृष्णा नदी काठच्या स्मशानभूमीत शुक्रवारी (दि. २९) रात्री पौर्णिमेचे औचित्य साधून ७ वाजण्याच्या सुमारास अंगाला अंगारा लावून एका मांत्रिकासह १४ ते १५ जणांची संशयास्पद पूजा सुरू होती. हा प्रकार गावातील काही युवकांच्या निदर्शनास आल्याने गणेशवाडीसह परिसरात खळबळ उडाली. रात्रीच्या वेळी हा विधी नरबळी देण्याचा प्रकार असेल या संशयातून युवकांनी या संशयास्पद व्यक्तींच्या विरोधात पोलिसात धाव घेत हा प्रकार उधळून लावला. त्यानंतर सर्व संशयित आरोपींना पोलिसांच्या स्वाधीन केले.
गणेशवाडी लगतच असणाऱ्या दहा किलोमीटर अंतरावरील म्हैसाळ (दि. सांगली) येथे काही महिन्यांपूर्वी भोंदू बाबाच्या भोंदूगिरीने एकाच कुटुंबातील नऊ जणांना विष पाजून हत्या केल्याचा प्रकार घडला होता. हा प्रकार अजूनही ताजा असताना गणेश वाडीच्या स्मशानभूमीत हा कोणता प्रकार सुरू आहे याच्या दहशतीने युवकांनी सुरू असलेल्या पूजेचा डाव उधळून लावला.
गणेशवाडी येथील स्मशानभूमीत अग्नी पूजा मांडून विधी सुरू होता. हा विधी सुमारे तीन तासाहून अधिक काळ सुरू होता. हा प्रकार गावातील काही युवकांच्या निदर्शनास आला असता त्यांनी स्मशानभूमीत मांडून ठेवलेल्या अग्नी पूजेजवळ लिंबू, कुंकू, हळद, मातीची मडकी,गुलाबाची फुले यासह अर्धवट जळालेल्या साहित्याची पूजा दिसून आली. हा काहीतरी नरबळी सारखा अघोरी प्रकार असल्याच्या संशयातून युवकांनी संबंधितांना धारेवर धरत प्रश्नांची सरबत्ती केली. आणि कुरुंदवाड पोलिसांशी संपर्क साधून संबंधितांना ताब्यात दिले.
सपोनी रविराज फडणीस यांनी 15 जणांना ताब्यात घेऊन त्यांची सखोल चौकशी केली असता मयत मुलाची शांती घालण्यासाठी हा विधी ते करत असल्याची माहिती त्यांनी दिली याबाबत सपोनि फडणीस यांनी खातरजमा करून संबंधितांना रात्री उशिरा सोडून दिले. मात्र या सर्व प्रकाराची नदीपलीकडील सात गावासह शिरोळ तालुक्यात चर्चा रंगली होती.