Latest

कोल्हापूर : राजकीय गोंधळाने कार्यकर्ते संभ्रमात

Arun Patil

कोल्हापूर ; चंद्रशेखर माताडे : राज्यातील सरकार बदलाच्या घडामोडीनंतर जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. आरोप-प्रत्यारोप आणि राजकीय गोंधळाने कार्यकर्ते संभ्रमात आहेत. नेते नॉट रिचेबल होताच कार्यकर्त्यांचा जीव वर-खाली होतो आणि त्यांची अवस्था 'कोणता झेंडा घेऊ हाती' अशी होते. गेले काही दिवस याच वातावरणात कार्यकर्ते वावरत आहेत.

महाविकास आघाडी सरकार जाऊन शिंदे-फडणवीस सरकार सत्तारूढ होताच जिल्ह्यातून शिवसेनेतील कोण-कोण शिंदे गटात जाणार, याची चर्चा सुरू झाली आहे. शिवसेनेचे जिल्ह्यातील एकमेव आमदार प्रकाश आबिटकर शिंदे गटात पहिल्याच फेरीत दाखल झाले. त्यापाठोपाठ स्वतंत्र निवडून आलेले व शिवसेनेच्या कोट्यातून राज्यमंत्री झालेले राजेंद्र पाटील-यड्रावकर हेही शिंदे गटात गेले आणि माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला.

नियमित कर्जफेड केलेल्या शेतकर्‍यांना 50 हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्यासाठी काढलेल्या जीआरमधील त्रुटी दूर करून सर्व पात्र शेतकर्‍यांना हा लाभ द्यावा, अशी मागणी घेऊन खा. धैर्यशील माने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटले. शिंदे यांनीही या निर्णयाची घोषणा करताना त्यांच्या नावाचा उल्लेख केला. तेव्हापासून 'माने नेमके कोणाचे' या चर्चेला वेग आला आहे.

शिवसेनेच्या मेळाव्यात 'गेले ते बेंटेक्स, राहिले ते खरे सोने' अशी गर्जना करणारे खा. संजय मंडलिक हे शुक्रवारी झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्याला उपस्थित नव्हते. शनिवारी त्यांचा फोन दीर्घकाळ नॉट रिचेबल होता. त्यामुळे तेही 'शिवसेनेत राहणार की शिंदे गटात जाणार' याची चर्चा सुरू झाली. धैर्यशील माने, चंद्रदीप नरके हेही शिवसेनेच्या मेळाव्याला उपस्थित नव्हते.

दरम्यान, आबिटकर, यड्रावकर आणि क्षीरसागर या तिघांनी शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' केला. मात्र, मेळाव्यात टीकेचा सारा रोख क्षीरसागर यांच्यावरच होता. यड्रावकर आणि आबिटकर यांची राजकीय जडणघडण काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अंगणात झाली आहे. मात्र, क्षीरसागर हे शिवसेनेचे आहेत. यांची सारी जडणघडण शिवसेनेतच झाली आहे. त्यामुळे टीकेचा सारा रोख त्यांच्यावर असणार हे अपेक्षित होते.

या राजकीय साठमारीत आता आणखी कोण कोठे जाणार, हे येणार काळच ठरविणार आहे. मात्र याच दरम्यान महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका, साखर कारखाने, सहकारी बँका यांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. नेत्यांचीच दिशा न ठरल्याने कार्यकर्ते संभ्रमात आहेत. या सर्व घडामोडीत आपण नेमकी कोणती भूमिका घ्यायची आणि घेतलेली भूमिका भविष्यकाळात अडचणीची तर ठरणार नाही, हे पाहून कार्यकर्ते सावध भूमिकेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT