Latest

कोकणातील कातळशिल्पे ‘युनेस्को’च्या ‘वारसा’ यादीत

मोहन कारंडे

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : कोकणातील विस्तीर्ण कातळांवर कोरण्यात आलेल्या प्राचीन शिल्पांना 'युनेस्को'च्या जागतिक वारसास्थळांच्या प्राथमिक यादीत स्थान मिळाले आहे. त्यात सिंधुदुर्गातील 18, रत्नागिरी जिल्ह्यातील 8 आणि गोव्यातील एका कातळशिल्पाचा समावेश आहे. 'युनेस्को'चे तज्ज्ञ प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर अंतिम यादीत स्थान मिळवण्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. कातळशिल्प संवर्धनासाठी प्रयत्न करणारे या सर्व प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत.

अश्मयुगीन काळापासूनची ही कातळशिल्पे प्राथमिक यादीतील स्थानामुळे आता आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचली आहेत. 'युनेस्को'कडून जगभरातील वारसास्थळांची यादी तयार केली जाते. गेल्यावर्षी गड-किल्ल्यांचा या यादीत समावेश झाला होता. गेल्या काही वर्षांत कोकणातील सड्यांवर कातळशिल्पांचा शोध लागला आहे. त्यामुळे वारसास्थळांच्या यादीत समावेश होऊन कोकणातील कातळांवर कोरण्यात आलेल्या प्राचीन शिल्पांचे जतन आणि संवर्धन होण्यासाठी पुरातत्त्व विभागाकडून कातळशिल्पांचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. त्यानुसार 'युनेस्को'ने जाहीर केलेल्या तात्पुरत्या यादीत या कातळशिल्पांना स्थान मिळाले आहे. त्यात रत्नागिरी जिल्ह्यातील कशेळी, रुंध्ये तळी, देवाचे गोठणे, बारसू, देवी हसोळ, जांभरूण, कुडोशी, उक्षी आणि गोव्यातील पानसायमोल या ठिकाणच्या कातळशिल्पांचा समावेश आहे.

सिंधुदुर्ग कातळशिल्पांनी समृद्ध

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण व देवगड तालुक्यांत एकूण 18 कातळशिल्पे मिळाल्याची नोंद आहे. यामध्ये मालवण तालुक्यातील कुडोपी, असरोंडी, मसुरे, कांदळगाव, खोटले, रामगड तसेच देवगड तालुक्यात वानिवडे, तळेबाजार, बापार्डे, आरे, कुणकेश्वर, साळशी, दाभोळे व अन्य गावांत मिळून अलीकडच्या काळात 18 कातळशिल्पे आढळून आली आहेत. यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा कातळशिल्पांनीदेखील समृद्ध असल्याचे मानले जात आहे.

कातळशिल्प संवर्धनाला खर्‍या अर्थाने वेग

पुरातत्त्व विभागाकडून कातळशिल्पांच्या संवर्धनासाठीची आवश्यक असलेली प्रक्रिया राज्यस्तरावर पूर्ण करून 'युनेस्को'च्या विहित नमुन्यातील सर्वंकष आणि सखोल प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडून त्याची छाननी केल्यानंतर त्रुटी दूर करून तो प्रस्ताव 'युनेस्को'ला सादर केला जाणार आहे. त्यानंतर 'युनेस्को'चे तज्ज्ञ प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT