पुणे : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, कसब्यात काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला आहे. भाजपच्या पारंपारिक मतदारसंघात महविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी विजय मिळवत भाजपच्या हेमंत रासने यांचा पराभव केला आहे. रवींद्र धंगेकर पहिल्या फेरीपासून आघाडीवर होते. त्यांच्या विरोधात प्रचार करण्यासाठी दिग्गज नेत्यांना प्रचारासाठी मैदानात उतरावं लागलं होत. भाजपला 40 स्टार प्रचारकांची फौज पाठवावी लागली शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रचारासाठी मैदानात उतरावे लागले.
कोण आहेत रवींद्र धंगेकर?
रवींद्र धंगेकर हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत, ते भाजपचे उमेदवार हेमंत रासणे यांच्या विरोधात उभे होते. प्रदीर्घ काळापासून भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसबा मतदारसंघात रवींद्र धंगेकर यांच्याकडे तगडे उमेदवार म्हणून पाहिले जात होते. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत कसब्यातून निवडून आलेले भाजपचे तत्कालीन उमेदवार गिरीश बापट यांच्याविरोधात त्यांचा थोड्या फरकाने पराभव झाला होता.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे अत्यंत जवळचे विश्वासू अशी रवींद्र धंगेकरांची ओळख होती. रवींद्र धंगेकर पूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत होते. मनसेमध्ये त्यांनी खूप मोठ्या पदावर काम केले आहे. रविंद्र धंगेकर हे पाच वेळा नगरसेवक असून त्यांनी पुणे महानगरपालिकेत शिवसेना आणि मनसेचे दोन वेळा प्रतिनिधित्व केलं आहे. 2017 मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि काँग्रेस समर्थित अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आले. यावेळी त्यांनी कसबा पेठ मतदार संघात बरीच काम केली होती. या विकास कामामुळे त्यांनी मनसेकडून २००९ ची विधानसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत भाजपचे खासदार गिरीश बापट यांना तंगड आव्हान दिले. त्या निवडणुकीत अवघ्या ७ हजार मतांनी बापट विजयी झाले. २०१४ मधेही कसबा पेठेतून रवींद्र धंगेकरांनी लढवली होती मात्र त्यांना पराभवाला सामोरे जावं लागलं.