कोल्हापूर : कोल्हापूर शहरातून धावणार्या केएमटीच्या ए. सी. बसेसचा प्रवास महागणार आहे. केएमटी प्रशासनाने प्रत्येक टप्प्यासाठी 2 रु. तिकीट दरवाढीचा प्रस्ताव तयार केला आहे. महापालिकेने शुक्रवारी (दि. 27) त्यावर शिक्कामोर्तब केले असून, अंतिम मंजुरीसाठी रिजनल ट्रान्स्पोर्ट अॅथॉरिटी (आर.टी.ए.) कमिटीकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्यानंतर तत्काळ तिकीट दरवाढ लागू करण्यात येईल. कडक उन्हात थंडगार ए.सी.तून प्रवास करणार्या प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे. मात्र, केएमटीला आर्थिक रुळावर आणण्यासाठी तिकीट दरवाढीचा हातभार लागणार असल्याचे अधिकार्यांचे मत आहे.
महिन्याला 3 लाख वाढ अपेक्षित
इतिहासात पहिल्यांदाच 18 सप्टेंबरला केएमटीच्या ताफ्यात ए. सी. बसेस आल्या आहेत. 19 सप्टेंबरपासून प्रवाशांच्या सेवेत बसेस धावू लागल्या. सर्व बसेस कोल्हापूर शहरांतर्गत सेवेसाठी वापरण्यात येत आहेत. 31 सीट आणि 9 स्टँडिंग असे प्रवासी बसमध्ये घेता येतात. 9 बसेसमधून दररोज सुमारे 3 हजार 500 प्रवासी प्रवास करतात. त्यातून केएमटीला रोज 40 ते 45 हजार रु. उत्पन्न मिळते. आजअखेर 69 हजार 287 प्रवाशांनी प्रवास केला असून, त्यातून केएमटीच्या तिजोरीत 9 लाख 30 हजार रुपये जमा झाले आहेत.
तिकीट दरवाढीनंतर दररोज सुमारे 8 ते 10 हजार याप्रमाणे महिन्याला सुमारे 3 लाख रुपये उत्पन्नवाढ अपेक्षित आहे. प्रवाशांना 10 रुपयाचे तिकीट 12 रु., तर 12 रुपयांचे तिकीट 14 रुपयांना पडणार आहे. अशाच पद्धतीने पुढील टप्प्यांसाठी वाढ असेल.
या मार्गावर धावतात ए. सी. बसेस
शाहू मैदान-आर. के. नगर-व्हाया एस. टी. स्टँड-शुगर मिल (2 बसेस)
शाहू मैदान-आर. के. नगर-व्हाया महावीर कॉलेज-शुगर मिल (2 बसेस)
पाचगांव ते कदमवाडी (2 बसेस)
कळंबा ते एस. टी. स्टँड (1 बस)
एस. टी. स्टँड-आपटेनगर-
बोंद्रेनगर (2 बसेस)
प्रवासी आहेत, पण बस नाहीत…
केएमटी म्हणजे कोल्हापूरची लाईफलाईन आहे. काही वर्षापूर्वीपर्यंत केएमटीच्या ताफ्यात तब्बल 129 बसेस होत्या. केएमटीने काळानुसार बदल केले नाहीत. परिणामी, केएमटीची धाव आर्थिकद़ृष्ट्या डबघाईकडे सुरू झाली. सद्यस्थितीत केएमटीच्या 63 बसेस रस्त्यावर धावत आहेत. त्यातून 42 हजार 600 प्रवासी रोज प्रवास करतात. केएमटीला त्यातून रोज सुमारे 8 लाख 15 हजार रु. उत्पन्न मिळते. मात्र, वाढत्या लोकसंख्येनुसार केएमटीच्या बसेस कमी पडत आहेत. प्रवासी आहेत, पण बसेस नाहीत, अशी स्थिती आहे. त्याचमुळे रस्त्यावरून धावणार्या बसेस प्रवाशांनी ओव्हरफुल्ल दिसत आहे.