पुढारी ऑनलाईन डेस्क : IPL 2022 च्या 35 व्या सामन्यात गुजरात टायटन्सने कोलकाता नाईट रायडर्सचा 8 धावांनी पराभव केला. केकेआरसमोर 157 धावांचे लक्ष्य होते, पण प्रत्युत्तरात त्यांचा संघ केवळ 8 गडी गमावून 148 धावा करू शकला. याचबरोबर त्यांनी 8 धावांनी सामना गमावला. केकेआरचा हा सलग चौथा पराभव आहे. आंद्रे रसेलने (48) सर्वाधिक धावा केल्या.
आंद्रे रसेल 48 धावा करून बाद झाला. जोसेफच्या चेंडूवर लॉकी फर्ग्युसनने त्याचा झेल टिपला. रसेल बाद झाल्याने कोलकात्याच्या विजयाच्या आशाही जवळपास संपुष्टात आल्या.
शिवम मावी दोन धावा करून राशिद खानचा बळी ठरला आहे. राशिदने कोलकाताला सातवा धक्का दिला आहे. यावेळी कोलकाताची धावसंख्या 15.2 षटकात 108 होती.
15 षटकांनंतर कोलकाताची धावसंख्या सहा विकेट्सवर 100 च्या पुढे गेली आहे.
राशिद खानने आयपीएलमध्ये 100 बळी पूर्ण केले. त्याने 83 सामन्यांमध्ये ही कामगिरी केली असून त्याने अमित मिश्रा, आशिष नेहरा यांसारख्या दिग्गजांची बरोबरी केली आहे. आयपीएलमध्ये सर्वात जलद 100 विकेट्स घेण्याच्या बाबतीत तो संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर आहे. मलिंगा (70) आणि भुवनेश्वर (82) यांनी त्याच्यापेक्षा कमी सामन्यांमध्ये ही कामगिरी केली आहे.
राशिद खानने कोलकाताला सहावा धक्का दिला आहे. व्यंकटेश अय्यरने रशीदला षटकार मारण्याचा प्रयत्न केला, मात्र अभिनव मनोहरने बाऊंड्री लाइनवर अप्रतिम झेल घेत त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. व्यंकटेशने 17 धावा केल्या.
या सामन्यात आंद्रे रसेलला चार धावांच्या जोरावर मोठे जीवदान मिळाले. यश दयालने आंद्रे रसेलला शमीकडे झेलबाद केले, पण तो नो बॉल ठरला आणि रसेलला जीवदान मिळाले.
यश दयालने कोलकाता संघाला पाचवा धक्का दिला आहे. त्याने रिंकू सिंगला यष्टिरक्षक रिद्धिमान साहाकडे झेलबाद केले. रिंकूने 28 चेंडूत 35 धावा केल्या.
श्रेयस अय्यर 12 धावा करून बाद झाला. त्यामुळे कोलकाता संघ अडचणीत आला. यश दयालने त्याला यष्टिरक्षक साहाकरवी झेलबाद केले. यावेळी सात षटकांनंतर कोलकाताची धावसंख्या 4 बाद 41 अशी होती.
157 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाता संघ अडचणीत दिसत आहे. पॉवरप्लेच्या आत संघाची तिसरी विकेट पडली. लोकी फर्ग्युसनने नितीश राणाला बाद करून केकेआरला तिसरा धक्का दिला. राणाने सात चेंडूंत दोन धावा केल्या. यष्टिरक्षक साहाने त्याचा झेल टिपला. फर्ग्युसनच्या चेंडूवर राणाच्या बॅटला चांगली धार होती, पण अंपायरने आऊट दिले नाही. हार्दिकने पंचांच्या निर्णयाला आव्हान दिले आणि निर्णय त्याच्या संघाच्या बाजूने गेला.
मोहम्मद शमीने कोलकाता नाईट रायडर्सला आणखी एक धक्का दिला. त्याने सुनील नरेनला फर्ग्युसनकरवी झेलबाद केले. नरेनने पाच चेंडूंत पाच धावा केल्या. कोलकाताचे दोन्ही सलामीचे फलंदाज 10 धावांतच पॅव्हेलियनमध्ये परतले. आता तीन षटकांनंतर कोलकाताची धावसंख्या दोन गड्यांच्या मोबदल्यात 11 धावा केल्या.
मोहम्मद शमीने पहिल्याच षटकात सॅम बिलिंग्जला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्याने अवघ्या चार धावा केल्या आणि त्याला यष्टिरक्षक साहाने झेलबाद केले. पहिल्या षटकानंतर कोलकाताची धावसंख्या एका विकेटवर पाच धावा होती.
आंद्रे रसेलने शेवटच्या षटकात चार बळी घेतले. त्यांने प्रथम अभिनव मनोहर नंतर लोकी फर्ग्युसन, राहुल तेवतिया आणि यश दयाल यांना बाद केले. गुजरातच्या संघाला शेवटच्या षटकात केवळ पाच धावा करता आल्या. या षटकात रसेलला दोनदा हॅट्ट्रिक संधी मिळाली, पण त्याची हॅट्ट्रिक पूर्ण झाली नाही. पुढील सामन्यात रसेल पहिल्याच चेंडूवर विकेट घेऊन हॅटट्रिक पूर्ण करू शकतो.
शिवम मावीने गुजरात संघाला तिसरा धक्का दिला आहे. त्याने डेव्हिड मिलरला उमेश यादवकरवी झेलबाद केले. मिलरने 20 चेंडूत 27 धावा केल्या. यावेळी गुजरातची धावसंख्या तीन गड्यांच्या मोबदल्यात 133 होती. आता राहुल तेवतिया कर्णधार पंड्याला साथ देण्यासाठी क्रीझवर आला आहे.
या सामन्यात चांगली सुरुवात करणाऱ्या गुजरात संघाची अखेर पडझड होताना दिसली. कर्णधार हार्दिकही 67 धावा करून बाद झाला. टीम साऊदीने त्याला रिंकू सिंगकडे झेलबाद केले.
गेल्या सामन्यात फलंदाजीने चमत्कार करणाऱ्या राशिद खानला या सामन्यात खातेही उघडता आले नाही. टीम साऊदीने त्याला उमेश यादवकरवी झेलबाद केले. 18 षटकांनंतर गुजरातची धावसंख्या पाच गड्यांच्या मोबदल्यात 140 धावा होती. या खेळपट्टीवर संथ चेंडू प्रभावी ठरला आणि कोलकाताच्या गोलंदाजांनी शेवटच्या षटकांमध्ये त्याचा फायदा घेतला. गुजरातने सात धावांत तीन विकेट गमावल्या.
डेव्हिड मिलरने आयपीएलमध्ये 100 षटकार पूर्ण केले आहेत. सुनील नरेनच्या चेंडूवर षटकार मारून त्याने आयपीएलमधील 100 षटकार पूर्ण केले. त्याचबरोबर गुजरातची धावसंख्या 14 षटकांत 114 धावा झाली होती.
उमेश यादवने कोलकाताला दुसरे यश मिळवून दिले. त्याने वृद्धीमान साहाला व्यंकटेश अय्यरकरवी झेलबाद केले. साहाने 25 चेंडूत 25 धावा केल्या. त्याने कर्णधार हार्दिकसोबत 75 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. आता गुजरातच्या उर्वरित फलंदाजांना आक्रमक फलंदाजी करत मोठी धावसंख्या उभारण्याची संधी आहे. 11 षटकांनंतर गुजरातची धावसंख्या दोन बाद 86 अशी होती.
नऊ षटकांनंतर गुजरात संघाने 1 गडी गमावून 73 धावा केल्या. कर्णधार हार्दिक 44 आणि ऋद्धिमान साहा 18 धावांवर खेळत होते. या दोघांसमोर कोलकाताचे गोलंदाज निष्प्रभ झालेले दिसत होते. मात्र, कोलकात्यासाठी चांगली गोष्ट म्हणजे गुजरातचे फलंदाज फार वेगाने धावा काढत नव्हते. या दोघांमध्ये अर्धशतकी भागीदारी झाली. यानंतर 10 षटकांनंतर गुजरातने एका विकेटवर 78 धावा केल्या.
गुजरात टायटन्सने एका विकेटच्या मोबदल्यात 50 हून अधिक धावा केल्या. कर्णधार हार्दिक या सामन्यात जबरदस्त लयीत दिसत असून वेगाने धावा काढत आहे. सात षटकांनंतर गुजरातची धावसंख्या 61 धावा होती.
पॉवरप्लेमध्ये गुजरात संघाने एक गडी गमावून 47 धावा केल्या. गिल स्वस्तात बाद झाल्यानंतर कर्णधार हार्दिक आणि ऋद्धिमान साहा यांनी डावाची धुरा सांभाळली आणि पॉवरप्लेमध्ये आपल्या संघाला कोणताही धक्का बसू दिला नाही.
कोलकात्याच्या वेगवान गोलंदाजांनी शेवटच्या दोन षटकांत दमदार पुनरागमन केले. टीम साऊदी आणि शिवम मावी यांनी फारशा धावा दिल्या नाहीत. पाच षटकांनंतर गुजरातची धावसंख्या एका विकेटवर 43 होती.
गुजरातची पहिली विकेट पडल्यानंतर ऋद्धिमान साहा आणि हार्दिक पंड्या आक्रमक फलंदाजी केली. दोघांनी तीन षटकांनंतर 11-11 धावा केल्या. यावेळी गुजरातची धावसंख्या 31 होती.
कोलकाताच्या संघात तीन बदल करण्यात आले आहेत. सॅम बिलिंग्ज, टीम साऊदी आणि रिंकू सिंग यांचे संघात पुनरागमन झाले आहे. आयपीएल 2022 मध्ये ही पहिलीच वेळ आहे जेव्हा एखाद्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
सलग तीन पराभवानंतर कोलकाता नाईट रायडर्सने अनेक मोठे बदल केले आहेत. सलामीवीर आरोन फिंच, यष्टिरक्षक शेल्डन जॅक्सन आणि वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स यांना संघातून वगळण्यात आले आहे. आता सुनील नारायण वेंकटेश अय्यरसह कोलकात्यासाठी डावाची सुरुवात करतील.
व्यंकटेश अय्यर, सुनील नरेन, श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, सॅम बिलिंग्ज (विकेटकीपर), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, टीम साऊदी, शिवम मावी, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती.
रिद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, हार्दिक पांड्या (कर्णधार), अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, अल्झारी जोसेफ, लोकी फर्ग्युसन, यश दयाल, मोहम्मद शमी.