जयसिंगपूर, पुढारी वृत्तसेवा : येथील स्टेशन रोडवरील शंखेश्वर ज्वेलर्सचे मालक नवलमल पोरवाल (वय 70) व त्यांचा पुतण्या यश पोरवाल यांचे पाच ते सहाजणांनी रविवारी रात्री नऊच्या सुमारास अपहरण केल्याने शहरात खळबळ उडाली. रात्री उशिरा जयसिंगपूर पोलिसांत या घटनेची नोंद झाली असून सीसीटीव्हीच्या आधारे प्राथमिक माहिती घेतली जात आहे. शहरातील सराफ व्यावसायिकांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्याच्या आवारात मोठी गर्दी केली होती.
नवलमल पोरवाल व त्यांचा पुतण्या यश हे रात्री दुकान बंद करून गांधी चौकातून दुचाकीवरून घरी जात होते. त्यांच्या घराजवळ असणार्या गल्ली नंबर दोनच्या बोळ भागामध्ये अंधाराचा फायदा घेऊन मारुती व्हॅनमध्ये दबा धरून बसलेल्या पाच ते सहा जणांनी त्यांची दुचाकी अडवली व त्यांना जबरदस्तीने व्हॅनमध्ये घालून त्यांचे अपरहण केले. पेंढारी यांच्या घरापासून नवीन डीपी रस्त्याने त्यांचे अपरहण केल्याचे स्पष्ट झाले.
या घटनेची माहिती शहरात वार्यासारखी पसरली. जयसिंगपूर पोलिस ठाण्याच्या आवारात पोरवाल यांचे नातेवाईक, सराफ व्यावसायिक जमले. पोलिस निरीक्षक संदीप कोळेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी सोळंके यांनी घटनास्थळी तपासाबाबत सूचना दिल्या. शहराबाहेर जाणारे रस्ते बंद केले. त्यानंतर घराच्या परिसरातील तसेच गांधी चौक येथे असणारे शंखेश्वर ज्वेलर्समधील सीसीटीव्हीचे कॅमेरे तपासण्यात आले. रात्री उशिरापर्यंत याबाबतचे कोणतेच धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले नाहीत. अपहरणाचे कारण पोलिस शोधत आहेत.