कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : शिल्पकलेचा अद्भुत आविष्कार असलेल्या; पण दोन महापुरांच्या तडाख्यांमुळे मोडकळीस आलेल्या खिद्रापूर (ता. शिरोळ) येथील कोपेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराकडे शासनाचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. परिणामी, यंदाच्या पावसाळ्यात यदाकदाचित महापूर आलाच, तर या मंदिराचे अस्तित्वच नष्ट होते की काय, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
2019 आणि 2021 साली कृष्णा नदीला आलेल्या महापुरांमुळे शिल्पकलेचा एक जगप्रसिद्ध ठेवा असलेल्या या मंदिराचे अपरिमित नुकसान झालेले आहे. मंदिराला ठिकठिकाणी तडे गेले आहेत. मंदिराचे मुख्य आकर्षण असलेल्या स्वर्गमंडपाच्या 20 खांबांना भेगा पडल्या आहेत. त्यापैकी 6 खांब हळूहळू बाहेरच्या बाजूस झुकत चालले असून, त्यामुळे स्वर्गमंडप कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. याबाबत दै. 'पुढारी'ने 19 मार्च 2022 रोजी सविस्तर वृत्त प्रसिद्ध करून मंदिराला निर्माण झालेला धोका शासनाच्या आणि पुरातत्त्व खात्याच्या निदर्शनास आणून दिला होता. पुरातत्त्व खात्यातील वरिष्ठ अधिकार्यांनीही या वृत्ताला त्यावेळी दुजोरा दिला होता.
दै. 'पुढारी'ने हे मंदिर वाचविण्यासाठी काय काय करता येईल, त्याबाबतच्या उपाययोजनाही सुचविलेल्या होत्या. तत्कालीन महाविकास आघाडी शासनाने या वृत्ताची तातडीने दखल घेऊन मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम हाती घेण्याची घोषणा केली होती. तत्कालीन आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दुसर्याच दिवशी या मंदिराला भेट देऊन पाहणी केली होती. त्याचप्रमाणे या मंदिराच्या दुरुस्तीसाठी 110 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली होती; पण अजून तरी घोषित रकमेपैकी एक नवा पैसासुद्धा याकामी जमा झालेला नाही.
कृष्णा नदीच्या कुशीत काळ्या कातळातून सुमारे 1,600 वर्षांपूर्वी साकारलेले हे शिल्पवैभव उभा आहे. जवळपास 7 राजवयींचा साक्षीदार असलेले हे मंदिर म्हणजे एक ऐतिहासिक ठेवा आहे. त्यामुळे या मंदिरावर धोक्याचे सावट दिसू लागताच जिल्ह्यातील तमाम लोकप्रतिनिधींनी त्याच्या बचावासाठी जीवाचे रान करायला पाहिजे होते. मात्र, तोंडदेखल्या घोषणा आणि कोरड्या आश्वासनांशिवाय याबाबतीत कोणत्याही लोकप्रतिनिधींकडून फारसे काही होताना दिसत नाही.
गेल्या काही दिवसांत तर मंदिराची अवस्था आणखीनच दयनीय होताना दिसत आहे. अगदी छोटासा पाऊस झाला, तरी मंदिराच्या भिंती पाझरू लागतात. मंदिराच्या भिंतींत पाणी मुरू लागते, स्वर्गमंडपाचे खांब कलण्याची प्रक्रिया तर धीम्यागतीने सुरूच आहे. त्यामुळे एखादा मोठा पाऊस झाल्यास किंवा येत्या पावसाळ्यात या मंदिराला निर्णायक धोका निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. आजकाल तर मंदिराचे पुजारी आणि पर्यटकांनाही या मंदिरात जायला भीती वाटू लागलेली दिसून येत आहे.
तशातच यंदा जर महापूर आलाच, तर मंदिराचे काय होईल ते सांगता येत नाही. काळाच्या ओघात आजकाल स्थापत्त्य कला कितीही विकसित झाली असली, तरी हे मंदिर जसेच्या तसे उभा करणे अशक्यप्राय आहे. त्यामुळे काहीही करून हे मंदिर वाचविण्यासाठी सर्वांनीच पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे.
गेल्यावर्षी या मंदिराचा अभियांत्रिकी द़ृष्टिकोनातून सर्व्हे करण्याचे काम सुरू करण्यात आलेले होते. पुण्यातील एका स्थापत्त्य विशारद संस्थेला हे काम देण्यात आलेले होते. त्याचप्रमाणे महाविकास आघाडीने या मंदिराच्या दुरुस्तीसाठी काही निधीची तरतूदही केलेली होती. याबाबतीत सद्यस्थिती नेमकी काय आहे, याबाबत लवकरच माहिती घेऊ.
– राजेंद्र पाटील-यड्रावकर, माजी राज्यमंत्री