नितीन कुलकर्णी (क्रीडा अभ्यासक)
ओडिशामध्ये हॉकी विश्वचषकासाठीच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. पण याची फारशी चर्चा होताना दिसत नाही. वास्तविक, भारतात हॉकी खेळाडूंची वानवा नाही. देशातील काही राज्यातील मुलींनी देखील बिकट परिस्थितीत वेळावेेळी आपली जादू दाखविली आणि देशाच्या संघात स्थान पटकावले. पण या क्रीडा प्रकाराला फारसे प्रोत्साहन दिले गेले नाही, हे वास्तव आहे. आता तरी देशातील हॉकीला पुन्हा वैभवशाली दिवस येतील अशी अपेक्षा आहे.
दशकांपूर्वी जगभरात असणारा भारतीय हॉकीचा दबदबा आता राहिलेला नाही आणि हे वास्तव आहे. कारण आपला देश क्रिकेटपुढे जातच नसल्याचे दिसून येते. देशभरात कोणताही एकदिवसीय किंवा टी-20 सामना असू द्या, मग पाहा तिकीट खरेदी करण्यासाठी किती झुंबड उडते. तिकिटावरून अक्षरश: हाणामारी होते. मात्र ओडिशातील हॉकी विश्वचषकावरून लोकांत फारसा उत्साह दिसून येत नाही. एवढेच नाही तर अनेकांना आपल्याकडे हॉकी विश्वचषक स्पर्धा आहे, हे देखील ठाऊक नाही. या स्पर्धेची सुरुवात 13 जानेवारीपासून झाली असून त्याचा अंतिम सामना 29 जानेवारी रोजी होईल. सामन्याचे आयोजन ओडिशाची राजधानी भुवनेश्वर आणि राऊरकेला येथे केले आहे. या स्पर्धांसाठी परदेशातील संघ भारत भूमीवर दाखल होत आहेत. मात्र विश्वचषकासारखी प्रतिष्ठेची स्पर्धा भारतात होत असतानाही प्रसार माध्यमांतून त्याची फारशी चर्चा होताना दिसून येत नाही. कर्णधार हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील भारताचा संघ राऊरकेला येथे पोचला आणि त्यांचे जोरदार स्वागतही झाले. माजी उपविजेता नेदरलँड, ब्रिटन, स्पेन, गतविजेता बेल्जियम आणि ऑस्ट्रेलियाचा संघ हे देखील दाखल झाले आहेत.
टोकिओ ऑलिपिंक स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्यानंतर भारतीय हॉकी संघाकडून आशा पल्लवित झाल्या आहेत. भारतीय संघाला 41 वर्षांनंतर ऑलिंपिकमध्ये पद जिंकण्यात यश आले. कर्णधार हरमनप्रीत सिंग म्हणतो, "आमचा संघ विश्वचषकासाठी तयार आहे. राऊरकेला येथे भारतीय संघाचे जंगी स्वागत झाले. आमच्या स्वागतासाठी हजारो लोक दुतर्फा उभे होते. त्यांच्या प्रेमाबद्दल बोलण्यासाठी शब्द नाही." हॉकीला प्रोत्साहित करण्यासाठी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी कोणतीही कसर ठेवलेली नाही आणि त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. त्यांच्याच प्रयत्नामुळे जागतिक हॉकी स्पर्धा ओडिशात होत आहे. भारतीय संघाने विश्वविजेतेपद पटकावले तर प्रत्येक खेळाडूला प्रत्येकी एक एक कोटी रुपयाचे बक्षीस देण्याची घोषणा पटनायक यांनी केली आहे. त्यांनी भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आणि 'विजयी भव:' अशी कामना व्यक्त केली.
राऊरकेला येथे विश्वचषकासाठी बिरसा मुंडा हॉकी स्टेडियम परिसर आणि विश्व कप सिटी तयार केली आहे. या ठिकाणी खेळाडू राहणार आहेत. ओडिशामध्ये सलग दुसर्यांदा विश्वचषकाचे आयोजन केले जात आहे. भारताने ऑलिंपिक स्पर्धांतील काही प्रकारातच सुवर्ण पदक जिंकले आहे. हॉकीत मात्र भारताची कामगिरी दमदार राहिली. हॉकीत आतापर्यंत आठ सुवर्णपदके जिंकले आहेत. 1928 च्या ऑलिंपिकमध्ये पहिल्यांदा खेळताना भारताने सुवर्णपदक जिंकलेे. तेव्हा भारताने पाच सामन्यांत एकूण 29 गोल केले. एकही गोल भारताविरोधात नव्हता. या ऑलिंपिकमध्ये ध्यानचंद यांनी एकट्याने चौदा गोल केले. या स्पर्धेनंतर ते हॉकीचे नायक म्हणून नावारूपास आले. 1932-36 या ऑलिंपिकमध्ये देखील त्यांनी आपल्या दमदार खेळीच्या बळावर भारताला आणखी दोन सुवर्णपदक जिंकून दिले.
दुसर्या महायुद्धानंतर ऑलिंपिक स्पर्धा पुन्हा सुरू झाल्या. तेव्हा देशाला ध्यानचंद यांच्याबरोबरच बलबीर सिंग सीनियर यांच्यासारखा आणखी एक दमदार हिरा लाभला. त्यांनी भारताला सलग तीन सुवर्णपदक जिंकून दिले. 1948, 1952 अणि 1956 मध्ये सुवर्णपदकाची हॅट्ट्रिक साधली. या हॅट्ट्रिकचे वैशिष्ट्ये म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हॉकी संघाला मिळालेले यश होते. भारताने शेवटचे सुवर्णपदक 1980 मध्ये मॉस्कोत जिंकले. 1989 मध्ये धनराज पिल्ले यांच्याकडे मोठ्या आशेने पाहिले गेले. त्यांनी एकट्याच्या जीवावर 1998 मध्ये आशियाई खेळात सुवर्णपदक पटकावले आणि अनेक वर्षांपासून पदकांचा असणारा दुष्काळ संपविला. मात्र परिस्थिती पोषक नसल्याने धनराज पिल्ले भारतीय हॉकीला सुवर्णवैभव परत मिळवून देऊ शकले नाहीत.
वास्तविक, भारतात हॉकी खेळाडूंची वानवा नाही. देशातील काही राज्यांतील मुलींनी देखील बिकट परिस्थितीत वेळावेेळी आपली जादू दाखविली आणि देशाच्या संघात स्थान पटकावले. हॉकी किंवा नेमबाजी असो, बॉक्सिंग असो… प्रत्येक क्षेत्रात महिलांनी नाव कमावले आहे. झारखंडची सावित्री पूर्ति, असुंंता लकडा, बिगन सोय यांनी आंतरराष्ट्रीय हॉकीत भारताचे नाव उंचावले. आता भारतीय हॉकी संघात झारखंडच्या चार मुली निक्की प्रधान, सलीमा टेटे, संगीता कुमारी आणि ब्यूटी डुंगडुंग खेळत आहेत. निक्की प्रधानने दोन वेळेस ऑलिंपिकमध्ये सहभाग नोंदविला आहे.
श्रीमंत देशातील खेळाडू जागतिक स्पर्धेत वरचष्मा गाजवतात. कारण तेथे खेळाडूंना चांगल्या सोयीसुविधा मिळतात. कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अमेरिका, रशियाच्या खेळाडूंचा बोलबाला असतो. आपल्याकडे मात्र उलट चित्र पाहावयास मिळते. ग्रामीण, दुर्गम, आदिवासी भागातील खेळाडू जगाच्या कानाकोपर्यात देशाचे नाव उंचावत आहेत. कोणतीही जागतिक स्पर्धा असली तरी तेथे भारताच्या ग्रामीण भागातील खेळाडूंची चर्चा ंहोत आहे. यातही महिला खेळाडूंचे योगदान महत्त्वाचे आहे. झारखंड, बिहार आणि पश्चिम बंगालच्या खेळाडूंचे उदाहरण घ्या. या ठिकाणी हॉकी आणि फुटबॉलची लोकप्रियता असून या राज्यांत दोन्ही खेळ प्रामुख्याने दिसून येतात.
कोरोना काळ सुरू होण्यापूर्वीच भारतीय फुटबॉल संघाच्या खेळाडूंची चाचपणी झाली होती. संघबांधणीसाठी ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनने प्रयत्न सुरू केले. यानुसार ज्या खेळाडूंची निवड करण्यात आली, त्यांना संधी आणि अचूक मार्गदर्शन मिळाले तर आगामी काळात हे खेळाडू देशाचे नाव निश्चित उंचावतील. मात्र आपल्याकडची सर्वात मोठी समस्या म्हणजे विविध क्रीडा संघटनांवर असणारे राजकीय नेत्यांचे वर्चस्व. वास्तविक माजी खेळाडूंकडे क्रीडा संघटनांची जबाबदारी सोपवायला हवी. परंतु आपल्याकडे नेमके उलटे चित्र दिसते. त्यामुळे क्रीडा संघटना या एकप्रकारे राजकीय आखाडाच बनल्या आहेत. क्रीडा संघटनात घराणेशाही, भ्रष्टाचार, राजकीय स्वार्थ हे देशाच्या क्रीडा संस्कृतीला मारक ठरत आहेत. या स्थितीचा फटका बसत असून आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय खेळाडूंचा निभाव लागत नाही. आपल्या देशात गुणवत्तेची कमतरता नाही. पोषक वातावरण तयार केले आणि तरुणांना प्रोत्साहन दिलेे तर प्रत्येक खेळाडू चांगली कामगिरी करू शकतो.
52 वर्षांपूर्वी 1971 मध्ये हॉकी विश्वचषकाला सुरुवात झाली होती. त्यानंतर या स्पर्धेत 10 संघ सहभागी झाले होते. अंतिम फेरीत स्पेनचा 1-0 असा पराभव करून पाकिस्तान पहिला विश्वविजेता ठरला. त्यानंतर भारताला कांस्यपदक मिळाले. भारतात 1982, 2010, 2018 हंगाम आयोजित केले गेले. त्यामुळे यंदा भारत चौथ्यांदा या स्पर्धेचे यजमानपद भूषवत आहे. यापूर्वी भारताने 1982, 2010 आणि 2018 मध्ये या स्पर्धांचे आयोजन केले आहे. पहिला विश्वचषक 1971 मध्ये खेळला गेला होता. त्यानंतर 1975 पर्यंत दर 2 वर्षांनी याचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर 1981 पर्यंत 3 वर्षांच्या अंतराने विश्वचषक झाला. त्यानंतर 1986 पासून सलग 4 वर्षांच्या अंतराने विश्वचषक होत आहे. 2022 मध्ये, कोव्हिडमुळे स्पर्धा हलवण्यात आली. आता जानेवारी 2023 मध्ये आयोजित केली जात आहे.
यंदाच्या स्पर्धेत कोणता देश बाजी मारणार हे पाहणे औचित्याचे ठरेल. 2021 च्या टोकियो ऑलिम्पिकचा अंतिम सामना ऑस्ट्रेलिया आणि बेल्जियम या दोन संघांमध्ये खेळला गेला होता आणि त्यात बेल्जियमने ऑस्ट्रेलियाला हरवून सुवर्णपदक जिंकले. बेल्जियम विश्वचषकाचा गतविजेताही आहे. भारताने जर्मनीला हरवून तब्बल 41 वर्षांनंतर टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले. ऑलिम्पिकपासून भारतीय संघ सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. भारत, ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, नेदरलँडस् यापैकी कोण बाजी मारतो ते पाहायचे !