अमृतसर : वृत्तसंस्था खलिस्तान समर्थक वारिस पंजाब दे या संघटनेशी संबंधित हजारो लोकांनी बंदुका, तलवारींसह अमृतसरच्या अजनाला पोलिस ठाण्यावर हल्ला चढवला आणि पोलिसांच्या नाकावर टिच्चून आरोपीला सोडवून नेले. वारिस पंजाब दे संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंग याचा निकटवर्तीय लवप्रीतसिंग तुफान याला पोलिसांनी अटक केली होती. सोशल मीडियात त्याच्याविरुद्ध लिखाण केल्याने त्याने एका युवकाचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण केली होती.
लवप्रीतसह 30 जणांवर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांना या प्रकाराची पूर्वकल्पना असल्याने 8 जिल्ह्यांतून आधीच अतिरिक्त कुमक बोलविण्यात आली होती. संख्येने 800 वर असलेल्या पोलिसांनाही जमावाने जुमानले नाही. अजनाला पोलिस ठाण्यावर ताबा मिळविला. पोलिस ठाण्याच्या छतावर चढून खलिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या. अखेर पोलिसांना लवप्रीतची सुटका करावी लागली.
आम्ही जास्तीत जास्त काय करू शकतो याचा अंदाज पोलिस अधूनमधून घेत असतात. म्हणून पोलिसांना आम्ही आमची ताकद दाखवून दिली.
– अमृतपाल सिंग,
प्रमुख, वारिस पंजाब दे, अमृतसर