कौलव (कोल्हापूर); पुढारी वृत्तसेवा : KDCC Bank election : कोल्हापूर जिल्हा बँकेच्या आगामी निवडणूकीत राधानगरी तालुका काँग्रेस व मित्रपक्षातर्फे भोगावती सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष व विद्यमान संचालक विश्वनाथ पाटील यांना रिंगणात उतरण्याचा निर्णय तालुक्यातील प्रमुख नेत्यांनी पत्रकार बैठकीत जाहीर केला.त्यामुळे तालुक्यातील राजकीय हवा तापली आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणूकीची प्रक्रिया सुरू होताच राधानगरीत विद्यमान संचालक व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील यांना शह देण्यासाठी जोरदार प्रयत्न चालू आहेत.आज कोल्हापूरात गोकुळचे माजी संचालक पी.डी.धुंदरे,तालुकाध्यक्ष हिंदुराव चौगले,दुधगंगा वेदगंगा साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष विजयसिंह मोरे,भोगावतीचे माजी अध्यक्ष संजयसिंह पाटील,माजी उपाध्यक्ष व विद्यमान संचालक विश्वनाथ पाटील यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली.या बैठकीत जिल्हा बँकेच्या निवडणूकीत काँग्रेस व मित्रपक्षांतर्फ विश्वनाथ पाटील यांना रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला.
आज संध्याकाळी भोगावती येथे झालेल्या पत्रकार बैठकीत याबाबत घोषणा करण्यात आली.यावेळी बोलताना पी.डी.धुंदरे व हिंदुराव चौगले यांनी गेल्या पंचवीस वर्षात जिल्हा बँकेच्या सत्तेअभावी काँग्रेस पक्षाची अपरिमित हानी झाली आहे.विद्यमान संचालकांनी मदत करणाऱ्यांना कधीही विश्वासात घेतले नाही.त्यामुळे ही निवडणूक लढवण्यासाठी ठरावधारक व कार्यकर्त्यातून दबाव वाढला आहे.त्यामुळे पक्षाचे अस्तित्व टिकवण्यासाठी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.यावेळी बोलताना विश्वनाथ पाटील यांनी गेल्यावेळी मी ए.वाय.पाटील यांच्यासाठी माघार घेतली होती.त्यामुळे पाटील यांनी आता माघार घेऊन काँग्रेसला संधी द्यावी.अशी मागणी करत आगामी निवडणूक कोणत्याही परिस्थितीत लढवणार असल्याचे स्पष्ट केले.यावेळी अन्य गटांतूनही उमेदवारी मागणार असल्याचे हिंदुराव चौगले व संजयसिंह पाटील यांनी सांगितले.
या पत्रकार बैठकीला गोकुळचे माजी संचालक पी.डी.धुंदरे,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हिंदुराव चौगले,भोगावती साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष व संचालक संजयसिंह पाटील,विश्वनाथ पाटील,ए.डी.चौगले,धिरज डोंगळे,बी.आर.पाटील,जयवंतराव कांबळे,रविंद्र पाटील,सिरसेचे सरपंच सुभाष पाटील आदी उपस्थित होते.