Latest

कर्नाटकप्रमाणे शिंदे-फडणवीस सरकार मुळासकट उखडून टाका : सिद्धरामय्या

दिनेश चोरगे
सांगली; पुढारी वृत्तसेवा :  ऑपरेशन कमळद्वारे आमदारांना कोट्यवधी रुपयांची खोकी देत प्रत्येक राज्यात सत्ता आणण्याचा भाजपचा खटाटोप सुरू आहे, अशी घणाघाती टीका कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली. देशात जातीय दंगली भडकविण्याचे कारस्थानही भाजपकडून सुरू आहे. तसेच संघ परिवाराने देशाची घटना संपविण्याचा घाट घातला आहे. अशा भाजपला कर्नाटकप्रमाणे देशातून तसेच महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार मुळासकट उखडून फेकून द्या, असे आवाहनही त्यांनी केले.
सांगलीत रविवारी नेमिनाथनगरच्या मैदानावर काँग्रेसचा महानिर्धार मेळावा झाला. यास जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी राज्यमंत्री व संयोजक आ. डॉ. विश्वजित कदम, ज्येष्ठ नेते आ. मोहनराव कदम, आ. विक्रम सावंत, माजी मंत्री आ. सतेज पाटील, प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, कर्नाटकचे उद्योगमंत्री एम. बी. पाटील, आमदार प्रणिती शिंदे आदी प्रमुख उपस्थित होते. यावेळी सिद्धरामय्या  यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
ते म्हणाले, सांगली जिल्ह्याने यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांच्यासारखे महान नेतृत्व देशाला दिले. चव्हाण हे राष्ट्रीय राजकारणात गेल्यानंतर दादांनी महाराष्ट्राचा विकास केला. त्यांच्यानंतर पतंगराव कदम यांनी चांगले काम केले. आजपर्यंत देशाचा व महाराष्ट्राचा विकास हा केवळ काँग्रेसमुळेच झाला आहे. कर्नाटकमध्ये बसव्वण्णा यांनी जशी सामाजिक क्रांती केली तशीच महाराष्ट्रात फुले, शाहू, डॉ. आंबेडकर यांनी केली. यांच्या विचारांनीच देश घडला. दीनदलित, सामान्य लोक समाजाच्या मुख्य प्रवाहात आले. आंबेडकर   नसते तर मी मुख्यमंत्री झालो नसतो. या महात्मांनी निर्माण केलेल्या सामाजिक ऐक्याला नख लावण्याचे काम सध्या भाजपकडून सुरू आहे.
गोळवळकर, सावरकर यांनी घटना अस्तित्वात आल्यापासून विरोध करणे सुरू केले. आताही त्यांच्या विचारांचा पक्ष संविधानाला विरोध करीत आहे. पण घटना संपली तर आपण सर्वजण संपू. त्यामुळे घटना वाचविण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन संघर्ष करण्याची गरज आहे.
ते म्हणाले, याशिवाय भाजपकडून जाती-धर्म, भाषा-प्रांत यावरून जातीय दंगली भडकविण्याचे कारस्थान सुरू आहे.  भय निर्माण करून लोकांचे जगणे मुश्कील करण्याचे काम भाजपकडून सुरू आहे. हा प्रयोग त्यांनी कर्नाटकमध्ये करण्याचा प्रयत्न केला, पण जनतेने तो मुळासकट उपटून फेकला. कर्नाटकमध्ये ऑपरेशन कमळद्वारे कोट्यवधी रुपये देवून आमदार खरेदी करून सरकार आणले. आताही तसाच प्रयत्न केला. पण आम्ही तो हाणून पाडला. महाराष्ट्रातही अशाच प्रकारे खोकी देवूून शिंदे-फडणवीस यांचे सरकार आणले आहे. कर्नाटकमधील विजय हा परिवर्तनाची नांदी आहे. महाराष्ट्रातील सरकारही असेच उखडून टाका.
कार्यक्रमास आमदार प्रकाश हुक्केरी, जयश्री पाटील, शैलजा पाटील, संजय बालगुडे, अमित पाटील, जितेश कदम, वीरकुमार पाटील, काकासाहेब पाटील, बसवराज पाटील, आर. व्ही. देशपांडे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT