कन्नड, पुढारी वृत्तसेवा : महाविद्यालयीन तरुणींची छेड काढणाऱ्या माथेफिरू तरुणाला समजावून सांगत असताना मुख्याध्यापक आणि वसतिगृह अधिक्षकावर संबंधित तरुणाने प्राणघातक हल्ला केला. हा प्रकार कन्नड शहरानजीक साखर कारखान्यासमोरील कर्मवीर काकासाहेब महाविद्यालयाच्या आवाराज घडला.
ही घटना चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार मक्रणपूर येथील मुजीब जमील शेख हा माथेफिरू तरुण शाळा सुटली की, दररोज शाळेबाहेर येऊन मुलींची छेड काढत असे. या प्रकरणी मुलींनी मुख्याध्यापक ए. पी. चव्हाण यांच्याकडे केली होती.
यामुळे शाळा सुटल्यावर संबंधित तरुण दिसल्याने मुख्याध्यापक चव्हाण यांनी दररोज इकडे कशाला येतो, म्हणून जाब विचारला. त्याचा पाठलग करत त्याच्या पाठीमागे संबंधित शिक्षक गेले. मक्रणपूर जवळ येथे पोहोचताच माथेफिरू तरुणाने थेट तलवार आणून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यास सुरुवात केली.
अंगावर आलेला वार मुख्याध्यापक यांनी चुकविला तरी त्यांच्या खांद्याला आणि कानाला गंभीर जखम झाली. हा प्रकार बघताच वसतिगृह अधिक्षक संतोष जाधव हे मदतीला धावले त्यांच्यावर वार करण्यात आला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. सर्व शिक्षक मदतीला धावल्याने माथेफिरू तरुण निघून गेला. सर्व शिक्षकानी जखमी अवस्थेत मुख्याध्यापक आणि सहकारी यांना उपचाराकरिता दवाखान्यात नेले आहे. या घटनासंदर्भात तरुणाच्या विरुद्ध सध्या पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.