चिचोंडी शिराळ (नगर), पुढारी वृत्तसेवा: कल्याण ते चिचोंडी एसटी बस दि.23 मेपासून सुरू झाल्याने कल्याणहून चिचोंडी येथे येणार्या आनंदभक्तांना बसचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून आनंद भक्त चिचोंडी येथे येत असतात.
आचार्य श्री आनंदऋषी महाराज यांची जन्मभूमी असणारे चिचोंडी हे गाव आहे. आनंदभक्तांना येण्यासाठी नेहमीच अडचण होत असे. ही अडचण दूर करण्यासाठी चिचोंडी परिसरातील शिराळ, कोल्हार, उदलमल, धारवाडी, गितेवाडी, डोंगरवाडी, डमाळवाडी, लोहसर या गावांतील सर्वच ग्रामपंचायतींनी कल्याण एसटी डेपोला वेळोवेळी निवेदन देऊन ही बससेवा सुरू करण्याची मागणी केली होती. त्यांच्या या मागणीला यश आले आहे. या बसमुळे आनंदभक्त व शालेय विद्यार्थी यांचा प्रवास सुखकर होणार आहे, असे जय हिंद सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष शिवाजी पालवे यांनी सांगितले.
ही बस कल्याण, आळे फाटा, नगर, जेऊर, बहिरवाडी, कोल्हार, मार्गे चिचोंडी येथे येणार आहे. कल्याण येथून सकाळी 10 वाजता सुटणार असून, कोल्हार येथे दुपारी 4 वाजता पोहोचेल. चिचोंडी येथून कल्याणकरिता दुपारी 4.30 वाजता सुटणार आहे. दरम्यान, मंगळवारी ही बस कोल्हार येथे पोहोचली तेव्हा तिचे कोल्हार ग्रामस्थांनी हार घालून व श्रीफळ फोडून स्वागत केले. चालक-वाहकांचा छोटासा सत्कार केला. ज्येष्ठ नागरिक शंकरराव जावळे, जयहिंदचे शिवाजी पालवे, शिवाजी गर्जे, महादेव पालवे गुरुजी, उपसरपंच गोरक्ष पालवे, धर्मनाथ पालवे, शंकरराव डमाळे, ग्रामपंचायत सदस्य संदीप पालवे, ईश्वर पालवे, भाऊसाहेब पालवे, नामदेव गिते, माजी सरपंच बाबाजी पालवे, आदी उपस्थित होते.