नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : विश्व कल्याणाची मनोकामना करीत भक्त जेव्हा पूजा-अर्चना करतो तेव्हा त्याच्या भक्तीभावाने प्रसन्न होऊन देवही त्याच्या पाठीशी उभा राहतो. महाराष्ट्रवासीय आणि अन्नदात्यांच्या उज्वल भविष्य, सुख-समृद्धीसाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल-रुक्मिणीची पूजा-अर्चना केली. त्यामुळे समाजहिताची दूरदृष्टी असलेले नेते के.सी.आर यांना विठ्ठल पावणारच, अशी भावना तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्या कन्या आणि विधानपरिषद आमदार के.कविता यांनी व्यक्त केली. (K. Chandrashekar Rao )
आषाढी एकादशी निमित्त तेलंगणाचे लोकप्रिय मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी मंगळवारी (ता.२७) सकाळी संपूर्ण मंत्रिमंडळ आणि पक्षाच्या सर्व आमदारांसोबत पंढरपूरात विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले. याबाबत के कविता म्हणाल्या, इतिहासात पहिल्यांदा दुसऱ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण मंत्रिमंडळ आणि आमदारांच्या उपस्थितीत महाराष्ट्राच्या विकासाचे साकडे विठुमाऊलीकडे घातले. तेलंगणा, महाराष्ट्रासह देशवासियांच्या समृद्धीसाठी के. सी. आर यांची कटिबद्धता यावरून दिसून येते, असे कविता म्हणाल्या. (K. Chandrashekar Rao)
के कविता पुढे म्हणाल्या, 'अबकी बार, किसान सरकार' हे बी. आर. एस आणि के. सी. आर सरकारचे घोषवाक्य आहे. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी के. सी. आर महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांच्या राजकीय आणि धोरणांवर प्रश्न उपस्थित करीत आहेत. अन्नदात्याचे जीवन अनेक समस्यांनी ग्रासले आहे. त्यांचे दु:ख, त्यांच्यावर पडणारे आर्थिक ओझे याची जाणीव के. चंद्रशेखर राव यांना आहे. तेलंगणाप्रमाणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसह त्यांच्या उत्तम आरोग्य आणि उज्वल भविष्यासाठी विठू-माऊलीचे दर्शन घेत के. सी. आर यांनी साकडे घातले.
प्रत्येक धर्म, जाती तसेच समाजबांधवांना सदैव सोबत घेऊन के.सी.आर यांचा अविरत प्रवास सुरू आहे. सर्वांना समानतेचा अधिकार मिळावा यासाठीची त्याची वचनबद्धता त्यांच्या प्रयत्नांमधून दिसून येते. सर्वसामान्य, शेतकरी, मजूर, युवक, वृद्ध तसेच महिला कल्याणासाठी राजकारण करणाऱ्या, सत्ता नाही तर जनसेवेने झपाटलेल्या एका नेत्याची देशाला आवश्यकता आहे. ही पोकळी भरुन काढण्याचे काम के. सी. आर पर्यायाने बी.आर.एस करीत असल्याचे के.कविता म्हणाल्या. त्यांनी यावेळी बीआरएसच्या पाठीशी उभे राहा, असे आवाहन केले आहे.
हेही वाचा