नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : हजारो किलोमीटर दूरून येऊन मराठयांनी पानीपतच्या भूमीत आपले शौर्य दाखवले होते. अटक ते कटक असे साम्राज्य असलेल्या मराठ्यांनी भारतीय संस्कृतीला जगाच्या पाठीवर मोठे करण्याचे काम केले. असे प्रतिपादन केंद्रीय नागरी उड्डयण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी पानीपत येथे बोलताना केले. तसेच भारताच्या स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या योगदानाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओळखले म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय नौदलात केलेल्या बदलाचा उल्लेखही केला.
मराठ्यांनी लढलेल्या पानीपत युद्धाला १४ जानेवारी २०२३ ला २६३ वर्ष पूर्ण झाली. या निमित्ताने शौर्य स्मारक समितीतर्फे पानीपत युद्धात आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या योद्ध्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ज्योतिरादित्य सिंधिया बोलत होते. दरम्यान, याच कार्यक्रमाचे नियोजित अतिथी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, भाजप नेते विनोद तावडे आणि खासदार श्रीकांत शिंदे हे देखील उपस्थित राहणार होते. मात्र यापैकी कुठलेही नेते कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही. रावसाहेब दानवे आणि विनोद तावडे यांनी हवामानाच्या अडचणीमुळे विमान उड्डाणाला झालेल्या उशीराने कारण आयोजकांना कळवले होते.
ज्योतिरादित्य सिंधिया यांनी जबरदस्त भाषण करत उपस्थितांची मने जिंकली आणि युद्धासह पानीपतच्या इतिहासावर प्रकाश टाकला. सिंधिया यांनी मराठीतुन भाषणाची सुरुवात केली. पानीपतची लोक हे आपले कुटुंब आहे. पानीपत ही श्रद्धा आणि बलिदानाची भूमी आहे. असे ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले. पानीपतच्या लढाईत लढलेले त्यांचे पूर्वज महादजी शिंदे आणि इतर पूर्वजांची आठवण त्यांनी काढली. माझ्यासाठी हा भावनात्मक क्षण आहे. इथे केवळ माझे पूर्वजच नव्हे तर ६० हजार मराठ्यांनी मातृभुमीच्या रक्षणार्थ बलिदान दिले असेही ते म्हणाले. यावेळी पानीपतमधील शौर्य स्मारक समितीच्या कामाचे कौतुकही त्यांनी केले. दरम्यान, शौर्य दिवस कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासह स्थानिक खासदार संजय भाटिया, आमदार प्रमोद कुमार वीज, स्थानिक आमदार महिपाल धांडा, स्थानिक नेते, पदाधिकारी तसेच आयोजक आणि शौर्य स्मारक समिती अध्यक्ष प्रदीप पाटील उपस्थित होते. या कार्यक्रमाला महाराष्ट्र आणि हरियाणासह उत्तर भारतातील विविध राज्यांमधील लोक उपस्थित होते.
यावेळी शेती क्षेत्रात दिलेल्या योगदानासाठी महाराष्ट्रातील पंजाबराव डख यांना २०२४ चा शौर्य सन्मान प्रदान करण्यात आला. तसेच इंडियन ऑइलने या ठिकाणी साकारल्या जात असलेल्या शौर्य स्मारकाला २० कोटी निधी दिला. त्याबद्दल इंडियन ऑइलचे प्रतिनिधी म्हणून त्यांच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांचे शौर्य स्मारक समितीच्या वतीने मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजक प्रदीप पाटील यांनी महाराष्ट्रातील नेत्यांच्या अनुपस्थितीबाबत खेद व्यक्त केला. शौर्य स्मारक समितीतर्फे बनवण्यात येत असलेल्या स्मारकाला आणि त्याच्या सुशोभीकरणासाठी निधीसह जागेची आवश्यकता असल्याचे प्रदीप पाटील म्हणाले. पानीपतच्या स्मारकावर लक्ष देणे ही महाराष्ट्र शासनाचीही जबाबदारी असल्याचे ते म्हणाले.
पानीपतमध्ये कोल्हापूरच्या पथकाची चित्तथरारक प्रात्यक्षिक
पानीपत येथे झालेल्या कार्यक्रमात कोल्हापूरच्या चाणक्य मर्दानी खेळ सांस्कृतिक सेवा संघ आणि रामकृष्ण मर्दानी खेळ विकास मंच संस्थेने शिवकालीन युध्दकला सादर केल्या. या युध्दकला सादरीकरणासाठी प्रशिक्षक संदिप लाड आणि संदिप जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ऋषीकेश अन्नछत्रे, तुषार पाटील, कृष्णा माने, अभिषेक करवळ, राजवर्धन लाड, स्वाती माने, प्रियंका करवळ, माधुरी सोनकांबळे, तनिषा होटकर, तन्वी होटकर, वेदर्षा जाधव, प्रांजल मिठारी, वैभवी कोळी यांनी पट्टा, तलवार, भाला, फरीगदगा, लाठी आदी खेळ आणि क्रिडा प्रकाराचे प्रदर्शन व सादरीकरण केले. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी या पथकाचे मुक्तकंठाने प्रशंसा केली त्याचबरोबर शिवकालीन खेळ अनेक क्रीडा प्रकर जपत असल्याबद्दल अभिनंदनही केले.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.