बारामती : पुढारी वृत्तसेवा : पक्ष व चिन्ह याबाबतच्या निवडणुक आयोगाच्या निकालाविरोधात उद्धव ठाकरे यांनी लवकर सर्वोच्च न्यायालयात जावे. त्या ठिकाणी न्याय मागावा. आम्हाला आशा आहे की न्यायदेवता निश्चित या प्रकरणात न्याय करेल, असे मत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केले. रविवारी (दि. १९) बारामतीत ते पत्रकारांशी बोलत होते. पवार म्हणाले, दोन हजार कोटी रुपये घेऊन निवडणूक आयोगाने चिन्ह व पक्षाचे नाव शिंदे गटाला दिले असा आरोप नुकताच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला होता, याबाबत माध्यमांनी पवार यांना विचारले असता ते म्हणाले, मी याबाबत अज्ञानी आहे, मला हे माहिती नाही.
मात्र एक जबाबदार खासदार असे बोलतात, सहसा सभागृहामध्ये आम्ही आमदार व खासदार काही भूमिका मांडली तर ते खरं समजून पुढे जायचे असते असा सभागृहाचा नियम आहे. पण यासंदर्भात वस्तुस्थिती माहिती नाही. हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरे यांनी अनेक निवडणुका लढवल्या. अनेकांना त्यांनी आमदार, खासदार, मंत्री केले. पक्षनिधी वळवल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले, त्यांच्या पक्षांतर्गत बाबींवर आम्ही चौकशी करण्याचे काही कारण नाही.