सांगली; पुढारी वृत्तसेवा : अजित पवार यांच्या गटाबरोबर वाटाघाटी सुरू आहेत, त्या अनुषंगानेच बैठका होत आहेत, यात अपयश आल्यास संघर्ष अटळ आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी दिली. आपले बंधू भगतसिंग पाटील यांना दिलेली ईडीची नोटीस ही साखर कारखाना विक्रीप्रकरणी माहिती घेण्यासाठी होती, असा खुलासाही त्यांनी केला. (Maharashtra NCP)
ते म्हणाले, आपण नेहमी बेरजेचे राजकारण करतो. पक्षासाठी प्रत्येक जण महत्त्वाचा असतो. राष्ट्रवादी पक्ष फोडून अजित पवार यांनी वेगळ्या पक्ष स्थापनेसाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज केला आहे. यासाठी त्यांंनी आपले म्हणणे सादर केले आहे. त्यानुसार शरद पवार यांनीही आपले म्हणणे आयोगाला दिले आहे. राष्ट्रवादी पक्ष एकसंध राहण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्या अनुषंगानेच कालची पुण्यात बैठक झाली. अजित पवार गटाबरोबर एकसंध पक्ष राहण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, अन्यथा भविष्यात संघर्ष अटळ आहे.
आपले बंधू भगतसिंग पाटील यांना आठ दिवसांपूर्वी राज्य बँकेकडून एक साखर कारखाना विक्रीप्रकरणी नोटीस बजावली होती. तीन दिवसांपूर्वी याबाबत त्यांनी समाधानकारक उत्तरही दिलेले आहे. याप्रकरणी त्यांच्यावर कोणताही आरोप नसून केवळ माहिती किवा साक्षीदार करण्यासाठी ही नोटीस आहे. यात कोणतेही राजकारण नाही.
आपण भाजपात जाणार अशा चर्चा आहे, याबाबत छेडता ते म्हणाले की, या निव्वळ वावड्या आहेत. मी एका मोठ्या पक्षाचा अध्यक्ष आहे. त्यामुळे अशा वावड्या जाणीवपूर्वक उठवण्यात येत आहेत. याकडे लक्ष देण्याची गरज नाही. (Maharashtra NCP)
संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल काढलेले उद्गार हे चुकीचे आहे. आता लवकरच निवडणुका होत आहेत. यामध्ये राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी जाती, धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न भाजपकडून सुरू आहेत. संभाजी भिडे यांनी अशा प्रकारचे निवेदन करणे हा त्यातलाच प्रकार आहे, असेही जयंत पाटील यावेळी म्हणाले.