Jayant Patil 
Latest

Jayant Patil : “राज्यातील सामाजिक सलोखा बिघडवण्याचा डाव”, जयंत पाटील यांचं मुख्यमंत्र्यासह उपमुख्यमंत्र्यांना पत्र

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्रातील सध्याच्या परिस्थितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठविले आहे. या पत्रात त्यांनी महाराष्ट्रात सध्या ज्या पद्धतीने वेगवेगळ्या कारणांवरून दंगली-दगडफेक यांसारख्या सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या परिस्थितीविषयी चिंता व्यक्त केली आहे. तसेच महिलांवरील वाढेलेले अत्याचार आणि गुन्हे याकडेही लक्ष वेधत सरकारने दोषींवर कडक कारवाई करण्याचे आवाहन केले आहे.

जयंत पाटील यांनी ट्विट करत हे पत्र सार्वजनिक केले आहे. ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, "महाराष्ट्रात सलोखा बिघडवण्याचे काम सध्या सुरू आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी विचारांच्या राज्यात दंगली, दगडफेक, महिलांवर अत्याचार असे प्रकार वारंवार घडत असताना राज्यातील पोलीस व गुप्तहेर खाते नक्की काय कारवाई करीत आहे, असा प्रश्न सामान्य लोकांच्या मनात निर्माण झाला आहे. या संदर्भात प्रकाश टाकणारे पत्र मा. मुख्यमंत्री आणि मा. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांना पाठविले. आपण या घडत असलेल्या प्रकारांची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ कडक कारवाई करण्याचे निर्देश संबंधितांना द्याल, अशी मला आशा आहे."

Jayant Patil : …राजकीय पोळी भाजण्याचा प्रकार; वाचा जयंत पाटील यांचे पत्र

प्रति,

मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य मा. उपमुख्यमंत्री तथा गृह मंत्री, महाराष्ट्र राज्य महोदय, नुकतीच कोल्हापूर येथे समाजमाध्यमातील आक्षेपार्ह छायाचित्रावरून झालेला गोंधळ, जळगाव पाळधी येथील ३१ मार्च रोजीचा प्रकार, छत्रपती संभाजी नगर येथील राम नवमी मिरवणुकीवर झालेली दगडफेक, मुंबई (मालाड मालवणी) येथे रामनवमी मिरवणूक वेळी झालेला वाद, नगर शेवगाव येथे १४ मे रोजी छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त निघालेल्या मिरवणुकीतील वाद, त्र्यंबकेश्वर येथे मंदिरासमोरील संदल प्रथेवरून वाद, संगमनेर येथील लव्ह जिहाद विरुद्ध निघालेल्या मोर्च्यानंतर समनापूर गावात झालेली दगडफेक या अलीकडील काळात घडलेल्या घटना पाहता यामागे विशिष्ट विचार धारेचे लोक कार्यरत असल्याचे लक्षात येत आहे. यामागे महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा बिघडविण्याचे काम जाणीवपूर्वक करण्याचा डाव असल्याचे निदर्शनास येत आहे. (Jayant Patil)

पत्र जयंत पाटील यांच्या ट्विटर हॅंडलवरुन साभार…

महाराष्ट्रासारख्या पुरोगामी विचारांच्या राज्यात असे प्रकार वारंवार घडत असताना राज्यातील पोलीस व गुप्तहेर खाते नक्की काय कारवाई करीत आहे, असा प्रश्न सामान्य लोकांच्या मनात निर्माण झाला आहे. महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था अडचणीत आणून विविध समाजामध्ये द्वेष निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रकार काही शक्ती करीत असताना त्यांच्यावर कारवाई न होणे ही बाब शासनाला निश्चितच भूषनावह नाही.

त्याचप्रमाणे मुंबई, चर्चगेट परिसरातील सावित्रीबाई फुले शासकीय वसतीगृहात घडलेली विद्यार्थिनीच्या हत्येची घटना दुर्दैवी आहे. राज्यात महिलांना सुरक्षित वाटले पाहिजे. महिलांवरील अत्याचार व त्यांचे गायब होण्याचे प्रमाण अलीकडील काळात मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. या घटनांची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करून सामान्य जनतेचे रक्षण करण्यात हे सरकार कटिबद्ध असल्याचे दाखवून द्यावे. अन्यथा फक्त ४० आमदारांच्या रक्षणासाठी हे सरकार कारभार करीत असल्याची सामान्य जनतेच्या मनातील भावनेस खतपाणी मिळेल. आपण ह्या घडत असलेल्या प्रकारांची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ कडक कारवाई करण्याचे निदेश संबंधितांना द्याल, अशी मला आशा आहे.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT