पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी आज पार पडली. राष्ट्रवादी ही अजित पवार गटाचीच असल्याचा निर्णय विधान सभा अध्यक्षांनी दिला आहे. यावर बोलताना जयंत पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याची भुमिका स्पष्ट केली. शरद पवारांच्या अध्यक्षपदाची निवडणूक झालेली होती. आम्ही अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. हा निर्णय अपूर्ण आहे, कोणाला तरी अपात्र करणे हा यातील मध्यम मार्ग असल्याचेही पाटील यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ५३ पैकी ४१ आमदार हे अजित पवार गटाकडे होते. या गटाकडे असलेले बहुमत शरद पवार गटाने देखील नाकरलेले नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष अजित पवारांचाच आहे, असा निर्वाळा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज (दि. १५) आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीवेळी दिला. तसेच अजित पवार व शरद पवार गटाचे सर्व आमदार पात्र ठरल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.