पुणे; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपद सोडण्याची घोषणा करताना त्यांचे सर्वांत विश्वासू आणि निष्ठावंत असलेल्या प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनाच विश्वासात घेतले नसल्याचे समोर आले आहे. धक्कादायक म्हणजे त्यानंतरच्या पुढील प्रकियेत त्यांना डावलण्यात येत असल्याने ते नाराज असल्याचे पुण्यात त्यांनी केलेल्या वकतव्यांवरून अधोरेखीत झाले आहे.
'लोक माझे सांगती' या राजकिय आत्मकथेच्या विस्तारीत आवृत्तीच्या प्रकाशन समारंभात पवार यांनी अध्यक्षपद सोडत असल्याची घोषणा केली. त्यांची ही घोषणा पक्षासाठी धक्का असली तरी प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्यासाठीही मोठा धक्का होता. त्यामुळे पवारांनी आपला निर्णय मागे घ्यावा, अशी आर्जव करताना त्यांना अक्षरश: रडू कोसळले. मात्र, पवारांच्या अध्यक्षपद सोडण्याच्या निर्णयाच्या दुख:पेक्षा या निर्णय प्रक्रियेत आपल्याला डावलले गेल्याची भावना त्यांना अधिक वेदनादायी वाटत असल्याचे दिसून आले.
बुधवारी एका बैठकीसाठी ते पुण्यात आले असतानाच मुंबईत राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली. याबैठकीला त्यांना बोलविण्यात आले नव्हते. याबाबत त्यांना पत्रकारांनी विचारणा केली असता त्यांनी 'मी प्रदेश पातळीवरचा छोटा नेता आहे. ती राष्ट्रीय स्तरावरील बैठक असून मला बैठकीला बोलविण्याची गरज वाटली नसेल' आणि प्रत्येक बैठकीला बोलविलेच पाहिजे, असा आग्रह नसावा असे सांगितले. त्यांच्या या वक्तव्यातून त्यांची नाराजी यावेळी स्पष्टपणे दिसून आली.
विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे अध्यक्षपद सोडण्यासंबंधीचा निर्णय पवार यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी चर्चा करून घेतला होता. खुद्द अजित पवार यांनी हे स्पष्ट सांगितले. त्यामुळे निष्ठांवत असून या निर्णयात आपल्याला विचारात घेतले गेले नाही याची खदखद पाटील यांना अधिक असल्याचेही दिसून येत आहे. एकदंरीतच पक्षाचे प्रमुख पद असून पक्षात खच्च्चीकरण होत असल्याची पाटील यांच्या कार्यकर्त्यांची भावना यानिमित्ताने झाली आहे. त्यामुऴे पाटील यांची
नाराजी आता कोणत्या दिशेला जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय पवार यांनी कायम ठेवला आणि त्यांच्या जागी सुप्रिया सुळे अध्यक्ष होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्राची सगळे सुत्रे अजित पवार यांच्या हातात जाणार आहेत. अशा परिस्थितीत पवार यांचे वर्चस्व वाढून जयंत पाटील यांचे पक्षातील महत्त्व संपवू शकते, अशी भीती पाटील यांच्या कार्यकर्त्यांना आहे. त्यामुळे एकूणच पाटील यांची अस्वस्था वाढणार्या या सगळ्या घडामोडी असल्याचे दिसून येत आहे.