वारणावती; आष्पाक आत्तार : चांदोली राष्ट्रीय उद्यानातील आंब्याचा एक वृक्ष गेली किमान दोन शतके तरी दिशादर्शकाचे काम करीत आहे. 'जनीचा आंबा' म्हणून त्याची ओळख आहे. उद्यानाच्या कार्यालयापासून साधारण 15 किलोमीटर अंतरावर हा महाकाय वृक्ष डौलदारपणे उभा आहे. उद्यानाचे अंतर जवळजवळ 105 किलोमीटर आहे. त्या उद्यानात चौफेर 50 किलोमीटर अंतरावरूनही हा वृक्ष सहज दिसतो.
चांदोली धरणाच्या मुख्य भिंतीवरून तसेच चांदोली परिसरातूनही तो सहज नजरेस पडतो. उद्यानातील सर्वात उंच ठिकाणावर व सर्वात उंच असा हा वृक्ष असल्यामुळे तो दिशादर्शनाचे काम करीत आहे.
पूर्वी संपर्काची साधने नव्हती. त्यावेळी जंगलात चुकलेले ग्रामस्थ, गुराखी, वन कर्मचारी, वनमजूर यांना योग्य दिशा दाखवण्याचे काम हा वृक्ष करीत होता. एखादे स्थान निश्चित करण्यासाठी या आंब्याच्या झाडाचा उल्लेख केला जायचा. उद्यानातील स्थलांतरित झालेली देवारे, झोळंबी, नांदोली या गावांच्या हद्दीवर हा वृक्ष आहे. मात्र त्याचे स्थान देवारे गावाच्या हद्दीत नोंदले जाते.
जाणकारांच्या मते सांगली जिल्ह्यातच नव्हे; तर आसपासच्या भागातही आंब्याचा एवढा मोठा वृक्ष नसावा. हा वृक्ष भलामोठा असला तरी त्याला फळे मात्र नाममात्रच येतात. आयुर्वेदिक औषधांसाठी त्यांचा वापर केला जातो. मातृवृक्ष म्हणूनही तो ओळखला जातो.
स्वातंत्र्यलढ्यात शिराळा व वाळवा ही क्रांतीची ठिकाणे होती. येथून लढा चालायचा. इंग्रजांना चुकवत अनेक क्रांतिकारक जंगलात मुक्काम करायचे. त्यावेळी त्यांनाही दिशादर्शनाचे काम हा वृक्ष करायचा. वन्यजीव विभागाने या वृक्षाजवळच उंच मनोर्याची उभारणी केली आहे. या मनोर्यावरून जंगलाचा देखावा दिसतो. या ऐतिहासिक ठेव्याची वन्यजीव विभागाकडे नोंद आहे.
गावाचा बोजा कमी करण्यासाठी शेतसारा भरणे आवश्यक होते. त्यावेळी जनाबाई नावाच्या महिलेने संपूर्ण शेतसारा भरला. तिची आठवण म्हणून तिथे असणार्या नैसर्गिक आंब्याचे नामकरण करून त्याला 'जनीचा आंबा' असे नाव देण्यात आले.
दुसर्या एका अधिकार्यांच्या मते गवळणवाडी (नांदोली) येथील एका महिलेचे नाव जनाबाई होते. गुरे चारण्याच्या निमित्ताने ती या आंब्याच्या झाडाजवळ आली होती. तिथेच तिचा मृत्यू झाला. त्यामुळे हे ठिकाण 'जनीचा आंबा' म्हणून ओळखले जाते.
काही वयोवृद्धांच्या मते जनाबाई नावाच्या महिलेनेच हा वृक्ष लावला आहे. नांदोली गावाच्या हद्दीवर तो होता. एखाद्याला ठिकाण सांगण्यासाठी जनीचा आंबा, असा त्याचा उल्लेख केला जायचा. मतमतांतरे असली तरी उंची आणि आकार या वैशिष्ट्यांमुळे दोन-अडीचशे वर्षांपासून तो सहजच सर्वांच्या नजरेत भरतो आहे.
पूर्ण वाढ झालेल्या रायवळ किंवा गावठी आंब्याच्या झाडाची उंची साधारण 35 ते 40 मीटर आणि घेर साधारण दहा मीटर इतका असतो. मात्र जनीचा आंबा मात्र याला अपवाद आहे. त्याची उंची 65 ते 70 मीटर आणि घेर पंधरा ते वीस मीटर आहे. हा भला मोठा वृक्ष पाहिल्यानंतर सर्वांना आश्चर्य वाटते.
या वृक्षाच्या इतिहासाबाबत मात्र अनेक मत-मतांतरे आहेत. एका वनाधिकार्यांच्या मते जनीचा आंबा नांदोलीच्या हद्दीत आहे. नियत क्षेत्रात वलकवाडी व इतर गावांचा समावेश आहे. पूर्वी येथे वसाहत होती. शेतसारा कोणी भरायचा, वसाहतीवर मालकी हक्क कोणाचा, यावरून वाद होता.