Latest

जळगाव : हवाल्याचे १५ लाख रूपये घेऊन जाणार्‍यांवर चाकू हल्ला; एक ठार, एक जखमी

निलेश पोतदार

जळगाव; पुढारी वृत्‍तसेवा

जळगावहून एरंडोल तालुक्यातील फरकांडे येथे हवाल्याचे १५ लाख रूपये घेऊन जाणार्‍यांची कार अडवत एका टोळक्याने यातील दोघांवर चाकू हल्ला केला. या हल्‍ल्‍यात एकजण ठार तर एक जखमी झाला आहे. चाकू हल्ला करत लुटण्याची ही धक्कादायक घटना शुक्रवार रात्री घडली.

या संदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, स्वप्निल रत्नाकर शिंपी (वय २९, रा. फरकांडे, ता. एरंडोल) यांचे कासोदा येथे धनदाई ट्रेडर्स या नावाचे शेतमाल खरेदीचे दुकान आहे. स्वप्निल हे शुक्रवारी दुपारी कासोदा येथून जळगाव येथे आले होते. सायंकाळी जळगाव येथून हवाल्याचे सुमारे १५ लाख रुपये घेतल्यानंतर कारने (एम.एच. ०१ ए.एल. ७१२७) त्यांच्याकडे कामाला असणार्‍या दिलीप राजेंद्र चौधरी (रा. फरकांडे) यांच्यासोबत गावी फरकांडे येथे निघाले होते.

रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पाळधी येथील साईबाबा मंदिराच्याजवळ असलेल्या पेट्रोलपंपालगत तुमच्या कारने एका दुचाकीस्वाराला उडवले असल्याचा बहाणा करून त्यांच्या कारच्या पाठीमागून तीन दुचाकींवर चारजण आले. त्यांच्या कारसमोर दुचाकी आडवी लावली.
यानंतर त्यांनी कारची चावी काढून स्वप्निल यांना बाहेर ओढले.

तर दुसर्‍याने दिलीप चौधरी यांच्यावर चाकूने वार करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, स्वप्निल शिंपी यांच्याकडून बॅग हिसकावण्यासाठी हल्लेखोरांनी त्यांच्यावर चाकूने वार केले. मात्र त्यांनी बॅग न सोडता ते जखमी अवस्थेत रस्त्याने पळत सुटले. या आरडाओरडीमुळे हल्लेखोर बॅग सोडून पळून गेले. ही माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी दोन्ही जखमींना रूग्णालयात नेले. मात्र स्वप्नील शिंपी यांना मृत घोषीत करण्यात आले. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT