जळगाव : पुढारी वृत्तसेवा – जळगावात महायुती व महाविकास आघाडीचा लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरु आहे. मात्र या सगळ्यात मोठ्या नेत्यांनी पाठ फिरवलेली दिसून येत आहे. असे असताना महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी शरद पवार हे जळगाव मध्ये दाखल झाले आहेत. उन्हाचा चटका आणि फटका बसत असताना सकाळ आणि संध्याकाळ वार्डात गावात प्रचाराच्या फेऱ्या होत आहे. अशा सभांवर आघाडी घेत शरद पवार जळगावात आले आहेत. तर, प्रकाश आंबेडकर हे वंचितचा किल्ला लढवित आहे.
2024 ची निवडणूक ही मुख्यतः महायुती व महाविकासआघाडी यांच्यात असून सर्व पक्ष आपापल्या परीने उमेदवाराचा प्रचार प्रसार करताना दिसून येत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शरद पवार यांनी प्रचार व सभांची धुरा हातात घेत स्वतः मैदानात उतरलेले आहेत. जळगाव मध्ये आज दोन सभा व एक बैठक असल्याने जरी एक तास उशिराने हेलिकॉप्टर विमानतळावर लॉन्च झाले असले तरी त्यांचा उत्साह कमी झालेला नाही. तर भाजपा वार्डातून जिल्ह्याचे मोठे नेते आपापल्या विधानसभा क्षेत्रात आपल्या उमेदवाराचा प्रचार करीत आहे. आठ तारखे नंतर जिल्ह्यात राज्याचे व देशाच्या नेत्यांच्या सभा होणार असल्याचे संकेत मिळत आहे. या प्रचार दौऱ्यात कोण येणार हे कोणीच सांगत नाही आहे. त्यामुळे सकाळ व संध्याकाळ प्रचाराचे दौरे आखले जात आहे. मात्र दुपारी उन्हाचा चटका बसत असल्याने कार्यालयात किंवा घरी आराम केला जात आहे.
वंचित आघाडीने आजपासून आपल्या प्रचाराच्या व सभेला सुरुवात करीत प्रकाश आंबेडकर यांना भुसावळ येथे रावेर लोकसभेचा किल्ला लढण्यासाठी पाचारण केले आहे. आंबेडकर येणार म्हणून कार्यकर्ते जोश मध्ये आहेत. परंतु हा जोश मतदानात किती दिसणार हे कोणीच सांगू शकत नाही. युतीच्या शिंदे गटातील नेत्याचे मन वळविण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे यांना यावे लागले. त्या नेत्याची नाराजी भाजपाला महागात पडू शकते म्हणून मुक्ताईनगर पर्यंत प्रदेश अध्यक्ष आले. खडसेंमुळे अनेकांची पंचायत झाली आहे. भाजपात प्रवेश झालेला नसतानाही ते प्रचारात उतरलेले आहेत. जेष्ठ असल्याने कार्यकर्ते त्यांची ऐकून घेत आहेत. मात्र तेही संभ्रमात पडले आहेत.
ज्याप्रमाणे जळगाव लोकसभेच्या लीड हा शिंदे गटाच्या आमदाराच्या विधानसभा क्षेत्रावर अवलंबून आहे तसेच रावेर लोकसभेमध्ये ही मुक्ताईनगर रावेर लोकसभेतून रक्षा खडसे यांना किती लीड मिळणार यावर गणित अवलंबून आहे. युती असो या आघाडी नेत्यांचे तार अजूनही जोडलेले दिसत नाही. त्यामुळे मोठे नेते फिरकताना दिसून येत नाहीये जे आहे ते आपल्या उमेदवारासाठी मैदानात उतरलेले आहेत. बाकी आपल्या मर्जीचे मालक झालेले आहे.
हेही वाचा –