नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) हिची बुधवारी (दि. १४) आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) तब्बल आठ तासहून अधीक काळ चौकशी केली. सुकेश चंद्रशेखर यांच्या मनीलाँड्रिंग प्रकरणी जॅकलिनची चौकशी करण्यात आली. हा २०० कोटींचा कथित घोटाळा असून या प्रकरणासंदर्भात जॅकलिनला तब्बल १०० हून अधिक प्रश्न विचारण्यात आले असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच तिला पुन्हा चौकशीला बोलावण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसही दिल्ली येथील आर्थिक गुन्हे शाखेत सकाळी ११ वाजता दाखल झाली होती. सुकेश चंद्रशेखर याने केलेल्या कथित २०० कोटींच्या घोटाळ्यासंदर्भात जॅकलिन हिची चौकशी करण्यात आली आहे. जॅकलिन हिचे नाव सुकेश चंद्रशेखर सोबत जोडले गेले आहे. त्यांच्या संबधांविषयी तसेच नात्याविषयी देखिल यावेळी जॅकलिनला प्रश्न विचारण्यात आले. सुकेश याने जॅकलिनला अत्यंत महागडे महागडे भेट वस्तू दिले आहेत. दरम्यान जॅकलिन फर्नांडिस हिला यापुर्वी दोन वेळा समन्स बजावण्यात आले होते. पण तीने दोन्ही वेळा गैरहजेरी लावली होती. स्पेशल सीपी रवींद्र यादव यांनी याप्रकरणी जॅकलिन हिची कसून चौकशी केली.
या प्रकरणी आणखी एक संशयित पिंकी इराणी व जॅकलिन फर्नांडिस यांचा या आधी जबाब नोंदविण्यात आलेला होता. दरम्यान यावेळी दोघींची समोर समोर बसून चौकशी करण्यात आली. यावेळी जॅकलिनने अनेक प्रश्नांची उत्तरे देण्याचे टाळले. तसेच दोघींची उत्तरे जुळत नसल्याचे देखिल निष्पन्न झाले. पिंकी इराणी हिनेच जॅकलिन फर्नांडिस आणि सुकेश चंद्रशेखर यांची भेट घडवून आणली होती. आज चालेल्या आठ तासांच्या चौकशी नंतर यावर अधिकारी पुन्हा चर्चा करतील व यानंतर पुन्हा जॅकलिनला बोलावतील अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.