Israel police uniform 
Latest

Israel police uniform : केरळमध्ये तयार केला जातोय इस्रायली पोलिसांचा गणवेश

दिनेश चोरगे

कन्नूर; वृत्तसंस्था :  इस्रायल-हमास यांच्यातील संघर्ष आता शिगेला पोहोचला आहे. अशातच केरळमधील कन्नूर जिल्ह्यातील एक कंपनी इस्रायली पोलिसांसाठी गणवेश तयार करत असल्याची माहिती समोर आली आहे. सुमारे आठ वर्षांपूर्वी इस्रायलने या कंपनीशी करार केला होता. त्यावेळीपासून ही कंपनी दरवर्षी सुमारे 1 लाख गणवेश इस्रायल पोलिसांना पुरवठा करते.

या कंपनीचे मुख्यालय मुंबई येथे आहे. हा करार होण्यापूर्वी इस्रायलचे प्रतिनिधी मुंबईत आले होते. त्यांनी कन्नूरमधील कंपनीच्या कारखान्याचे उच्च अधिकारी, डिझाईनर आणि गुणवत्ता नियंत्रकांसह भेट दिली. सुमारे 10 दिवस ते तेथे राहिले होते. करारानुसार केरळची कंपनी इस्रायल पोलिसांसाठी फिकट निळ्या रंगाचे फूल स्लीव्ह शर्टची निर्मिती करते. शर्टच्या दुहेरी खिशाशिवाय कंपनीने इस्रायल पोलिसांचे चिन्हही डिझाईन केले आहे. हमाससोबत युद्ध सुरू होण्यापूर्वी इस्रायलने कपड्यांची ऑर्डर दिली होती.
त्यांनी पोलिस प्रशिक्षणासाठी कार्गो पँट आणि शर्ट युनिफॉर्म सेट मागवला आहे. यासाठी कापड तयार करण्याचे काम सुरू असून नोव्हेंबरच्या अखेरीस अथवा डिसेंबरच्या सुरुवातीस शिलाई सुरू करण्याची योजना आहे. डिसेंबरपर्यंत त्याची पहिली खेप इस्रायलला पाठवली जाणार असल्याची माहिती कंपनीच्या मालकाने दिली.

कंपनीत 95 टक्के महिला

2006 मध्ये तिरुवनंतपुरममधील किन्फ्रा पार्कमध्ये गणवेश निर्मिती कंपनी सुरू करण्यात आली. त्यानंतर स्थानिकांना रोजगार मिळवून देण्यासाठी जी कंपनीला कन्नूरला हलविण्यात आली. कन्नूर जिल्हा हातमाग आणि कापड निर्यातीसाठी ओळखला जातो. या कंपनीत सुमारे 1500 कर्मचारी कार्यरत असून यामध्ये 95 टक्क्यांहून अधिक महिलांचा समावेश आहे. ही कंपनी जगभरातील विविध देशांतील लष्करी जवान, पोलिस आणि सुरक्षा अधिकार्‍यांसाठी गणवेश बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्याशिवाय ही कंपनी शालेय विद्यार्थी, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि सुपरमार्केट कर्मचार्‍यांसाठी गणवेश तयार करते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT