इथल्या युद्धजन्य परिस्थितीवर लेख लिहिण्याची दुर्दैवाने माझ्यावर वेळ आली आहे. इथल्या परिस्थितीवर खरंखुरं तटस्थ भाष्य करण्याची मला नितांत गरज वाटते.
इस्रायलच्या दक्षिण भागात गाझा पट्टी आहे. पॅलेस्टाईनच्या दोन विभक्त भागांपैकी हा एक तुलनेने बराच लहान आहे. हा प्रदेश हमास या इस्लामिक दहशतवादी संघटनेच्या ताब्यात आहे. 7 ऑक्टोबर 2023 ला सकाळी 6 च्या दरम्यान गाझा पट्टीमधील हमासचे शेकडो दहशतवादी गाझा पट्टीला लागून असलेल्या इस्रायलमधील काही गावांत इस्रायली सीमाकवच तोडून घुसले. प्रमुख शहरांवर रॉकेटस् सोडायला सुरुवात केली.
शेकडो दहशतवादी वेगवेगळ्या मार्गांनी इस्रायलच्या सीमेवरील सुमारे 22 गावांत घुसले असावेत. या अतिरेक्यांनी रस्त्यांवर सकाळी व्यायामासाठी, बाहेर फेरफटका मारण्यासाठी गेलेल्या इस्रायली आबालवृद्धांची इस्रायली चेक पोस्टमधील सैनिक, पोलिसांची हत्या केली. इस्रायली सैनिकांच्या मृतदेहांसोबत विजयी आविर्भावाचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर टाकून जल्लोष सुरू केला. इस्रायली सैनिकांचे मृतदेह परत गाझामध्ये नेले. काही इस्रायली गावांमध्ये या दहशतवाद्यांनी इमारती स्वतःच्या ताब्यात घेतल्या आणि बेछूट गोळीबार सुरू केला. घराघरांत जाऊन बेल वाजवून अजाणत्या लोकांनी दरवाजा उघडला की, त्या घरांमध्ये आग लावली, वस्तूंची नासधूस करून इस्रायलींना मारून आणि त्यांचे अपहरण करून गाझामध्ये ओलिस म्हणून नेले. ज्यू लोकांच्या सणांनिमित्त इथे सध्या सुट्ट्या सुरू आहेत. त्यामुळे शुक्रवारी म्हणजेच आदल्या दिवशी रात्री सुमारे हजारभर तरुण मुलं-मुली दक्षिण इस्रायलमधीलच एका ठिकाणी उघड्या माळरानावर पूर्ण रात्रभर पार्टीसाठी जमले होते. पार्टीनंतर शनिवारी पहाटे जागच आली ती आकाशात दिसणार्या रॉकेटच्या धुराने आणि उठून बघतायत तोवर समजलं की, आपल्या पूर्ण ग्रुपला पण हमासच्या अतिरेक्यांनी वेढा घातला आहे. त्या हजारभर मुला-मुलींनी वाट दिसेल तिकडे धावायला सुरुवात केली खरी; पण बेछूट गोळीबार करणारे दहशतवादी त्यांच्या मागावर होतेच. काहींनी खूप अंतर धावून इमारतींमध्ये आश्रय घेतला. पण दुर्दैवाने त्या इमारतीसुद्धा दहशतवाद्यांनी आधीच ताब्यात घेतल्या होत्या. काही मुला-मुलींची मात्र निव्वळ दैवयोगाने सुटका झाली तर काहींना ओलिस म्हणून गाझामध्ये नेण्यात आले आहे.
एकूण सुमारे 5000 रॉकेटिस् सोडली. परंतु जगात एकट्या इस्रायलकडे असलेल्या आयर्न डोम या प्रणालीने यापैकी बरेच रॉकेटस् नष्ट केले. दूरदर्शनवर जसं रामायण किंवा महाभारतात दाखवलं जायचं की, रावणाने किंवा कौरवांनी सोडलेल्या बाणाचा रामाने किंवा पांडवांनी मारलेल्या बाणाने हवेतच अचूक वेध घेतला, अगदी तसेच ही आयर्न डोम यंत्रप्रणाली काम करते.
इस्रायली लष्कराने योजना ठरवून बचाव मोहिमा सुरू केल्या. एक मोहीम म्हणजे घुसखोरी केलेल्या दहशतवाद्यांना कंठस्नान घालून अडकलेल्या नागरिकांना सोडवणे आणि दुसरी मोहीम म्हणजे गाझामधील हमासच्या केंद्रांवर हवाई प्रतिहल्ले सुरू करणे. इथे प्रत्येक नागरिकाला सैनिकी प्रशिक्षण दिलं जात असल्याने हजारो इस्रायली नागरिकांना या कारवाईसाठी बोलावण्यात आलं आहे. सत्ताधारी आणि विरोधी सरकारने मिळून परिस्थिती प्रभावीपणे हाताळण्यासाठी एक एकत्रित आपत्कालीन सरकार बनवलं आहे.
(लेखिका सध्या इस्रायलमध्ये स्थायिक आहेत. त्या मूळच्या रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील आहेत. त्यांच्या फेसबुक पेजवरून साभार.)