एल्गार इराणी अभिनेत्रींचा 
Latest

इराणी अभिनेत्रींना सार्वजनिक ठिकाणी डोके झाकणे बंधनकारक; आदेशाविरूद्ध अभिनेत्रींचा एल्‍गार

Arun Patil

मध्ययुगीन मानसिकता असणार्‍या देशांत स्वातंत्र्याची गळचेपी ही सर्वसामान्य बाब. इराणसारखा देश यामध्ये नेहमीच चर्चेत असतो. अलीकडेच तेथे चित्रपटांसह अन्य ठिकाणी काम करणार्‍या अभिनेत्रींसाठी नवा फतवा जारी केला आहे, यानुसार सार्वजनिक ठिकाणी वावरताना डोके झाकणे बंधनकारक केले असून, या आदेशाचे पालन न करणार्‍या अभिनेत्रींना काम करण्यास मनाई केली आहे. या आदेशाविरुद्ध अभिनेत्रींनी एल्गार पुकारला आहे.

इराणमध्ये स्वातंत्र्याची गळचेपी ही सर्वसामान्य बाब. चित्रपटांसह अन्य ठिकाणी काम करणार्‍या नायिकांसाठी इराणने नवा फतवा जारी केला आहे, यानुसार सार्वजनिक रूपातून वावरताना डोके झाकणे बंधनकारक केले असून, या आदेशाचे पालन न करणार्‍या नायिकांना काम करण्यास मनाई केली आहे; पण या आदेशाविरुद्ध नायिकांनी एल्गार पुकारला आहे. अर्थात, इराणमधील सामान्य महिलांना मात्र याची जबर किंमत मोजावी लागत आहे. ऑक्टोबरच्या अखेरीस इराणच्या 'मिनिस्ट्री ऑफ कल्चर अँड इस्लामिक गाईडन्स'ने सरकारचे आदेश न पाळणार्‍या अभिनेत्रींची नावे जाहीर केली असून, त्यांना काम करण्यास बंदी घातली आहे. या नायिका अनेक ठिकाणी डोक्याला स्कार्फ न बांधता फिरताना दिसल्याचे इराण सरकारचे म्हणणे आहे.

मंत्रालयाची जबाबदारी सांभाळणारे मंत्री मोहम्मद मेहदी इस्माईल यांनी आदेशाचे समर्थन करताना म्हटले की, ज्या नायिका हिजाब कायद्याचे पालन करत नाहीत, त्यांना काम करणे शक्य नाही. या यादीत वीसजणांची नावे असून, त्यात प्रसिद्ध अभिनेत्री तरानेह अलीदुस्तीचाही समावेश आहे. 39 वर्षीय अलीदुस्ती प्रसिद्ध नायिका मानली जाते. तिने परकीय चित्रपटांच्या श्रेणीतील ऑस्कर जिंकणार्‍या 'द सेल्समन' (2016) मध्ये काम केले आहे. अलीदुस्ती ही प्रारंभीच्या काळात सार्वजनिक ठिकाणी हिजाबचे पालन करत असे. मात्र, गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये महसा अमीनीचा मृत्यू झाल्यानंतर वातावरण बदलले आणि त्यानंतर इराणच्या दडपशाहीला विरोध सुरू झाला.

22 वर्षीय महसा अमीनीला इस्लामिक ड्रेसकोडचे पालन न केल्याच्या कारणावरून अटक करण्यात आली. त्यानंतर तिचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला. यानंतर इराणच्या महिला रस्त्यावर उतरल्या. जगभरातही त्याचे पडसाद उमटले. या आंदोलनात अभिनेत्री अलीदुस्तीही सामील झाली होती. तिने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आणि त्यात तिने हेडस्कार्फ घातलेला दिसत नाही. या फोटोत तिच्या हातात इराणी महिला हक्क आणि सरकारविरोधी आंदोलनाच्या समर्थनार्थ एक कागद झळकावलेला दिसतो. या कागदावर महिला, आयुष्य आणि स्वातंत्र्य, असे लिहिले आहे. हा फोटो पोस्ट झाल्यानंतर काही वेळातच अलीदुस्तीला अटक करण्यात आली. त्यानंतर दोन आठवड्यांनी तिची सुटका करण्यात आली.

इराणमध्ये सार्वजनिक ठिकाणी वावरताना डोके न झाकणे हे जीवावर बेतणारे राहू शकते. तेहरानमध्ये राहणार्‍या एका इराणी विद्यार्थिनीने सांगितले की, आम्ही आमचे आयुष्य दररोज धोक्यात घालून जगत आहोत; कारण आम्ही स्कार्फ न घालता बाहेर पडतो; पण इराण सरकारच्या भीतीपोटी काही नायिका अजूनही स्कार्फ घालत असून, ही बाब दुर्दैवी आहे. तिला आपल्या बोलण्यातून इराणमध्ये नुकत्याच घडलेल्या आणखी एका दुर्दैवी घटनेची आठवण करून द्यायची होती. तिचा अंगुलीनिर्देश हा इराणी दिग्दर्शक दारिउश मेहरजुई आणि त्यांची पत्नी पटकथाकार वाहदीदेह मोहम्मदफार यांच्या अंत्ययात्रेकडे होता. ऑक्टोबरच्या मध्यात दोघेही राहत्या घरात चाकूहल्ल्यात जखमी झाल्याच्या अवस्थेत सापडले होते. या घटनेने चित्रपट उद्योग आणि सर्वसामान्य हादरले. अनेक निर्मात्यांप्रमाणेच मेहरजुईही इराण सरकारशी या नियमावरून वाद घालत असत. इराणची अभिनेत्री शोले पाकरावन म्हणते, तरुण पिढी आमच्यावर नाराज आहे आणि हे आम्ही जाणून आहोत. पाकरावन या 2017 पासून जर्मनीत राहत आहेत. तीन वर्षांपूर्वी त्यांची मुलगी रेहाने जब्बारी यांना इराणमध्ये मृत्युदंडाची शिक्षा सुनावली होती; कारण तिने बलात्काराचा प्रयत्न करणार्‍या आरोपीचा खून केला होता. पाकरावन यांनी मुलीला वाचवण्यासाठी बराच संघर्ष केला. मात्र, त्या यशस्वी ठरल्या नाहीत. आता त्या दुसर्‍यांसाठी आवाज बुलंद करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT