पुढारी ऑनलाईन डेस्क : Ruturaj Gaikwad CSK Captain : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 चा हंगाम 22 मार्चपासून सुरू होत आहे. पण त्याच्या एक दिवस आधी चेन्नई सुपर किंग्स (CSK) फ्रँचायझीने एक मोठी घोषणा करत महेंद्रसिंग धोनीच्या जागी ऋतुराज गायकवाडकडे कर्णधार पद सोपवले आहे. आयपीएलच्या सतराव्या हंगामातील सलामीचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे.
आयपीएलच्या 17 व्या हंगामाची (IPL 2024)ची सुरुवात गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) यांच्यातील सामन्याने होणार आहे. याआधी CSK ने संघ नेतृत्वात बदल केला. फ्रँचायझीने युवा सलामीवीर ऋतुराज गायकवाडवर विश्वास दाखवत त्याच्याकडे संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवली आहे. या घोषनेनंतर सीएसकेच्या वतीने गायकवाड सर्व संघांच्या कर्णधारांच्या फोटोशूटमध्ये सहभागी झाला होता.
27 वर्षीय गायकवाड सीएसकेचा चौथा कर्णधार असेल. धोनीशिवाय याआधी रवींद्र जडेजा आणि सुरेश रैना यांनी कर्णधारपद भूषवले आहे. धोनीने 226 सामन्यात चेन्नई संघाचे नेतृत्व केले आहे. जडेजाने 8 तर रैनाने 5 सामन्यात नेतृत्व केले आहे.
आयपीएल 2022 मध्येही सीएसकेने आयपीएल सुरू होण्याच्या एक दिवस आधी नवीन कर्णधाराची घोषणा केली होती. त्यावेळी रवींद्र जडेजाची कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली होती. पण त्या हंगामात जड्डूच्या नेतृत्वाखाली चेन्नई संघाची कामगिरी खराब झाली. त्यानंतर जडेजाला हटवून धोनीकडे पुन्हा कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली होती.
42 वर्षीय धोनीने 15 ऑगस्ट 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. मात्र तो आयपीएलमध्ये खेळत आहे. त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने (2010, 2011, 2018, 2021, 2023) आयपीएलचे 5 वेळा विजेतेपद पटकावले आहे.
धोनीने आयपीएलमध्ये आतापर्यंत 250 सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 38.79 च्या सरासरीने आणि 135.91 च्या स्ट्राइक रेटने 5,082 धावा केल्या आहेत. नाबाद 84* ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. त्याच्या नावावर 24 अर्धशतके आहेत. धोनी हा लीगमध्ये सर्वाधिक धावा करणारा 7वा खेळाडू आहे. तो 87 डावांत नाबाद राहिला आहे. त्याने 349 चौकार आणि 239 षटकार मारले आहेत.
धोनीने 2008 च्या पहिल्या आयपीएल हंगामापासून सीएसकेचा कर्णधार राहिला. या लीगमधील सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये तो अव्वल स्थानी आहे. त्याने 226 सामन्यांमध्ये आपल्या फ्रेंचायझीचे नेतृत्व केले आहे. यातील 133 सामने जिंकले आहेत तर 91 सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. 2 सामन्यांचा निकाल लागला नाही. धोनीच्या नेतृत्वाखाली संघाची विजयाची टक्केवारी 58.84 इतकी आहे.
सीएसकेने 2019 च्या लिलावात ऋतुराज गायकवाडला 20 लाख रुपयांना विकत घेतले होते. पण त्याला 2019 च्या हंगामातून आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली नाही. पुढच्या वर्षीच्या हंगामात म्हणजे 2020 मध्ये, एमएस धोनीने त्याला संधी दिली आणि तेव्हापासून त्याने एकदाही मागे वळून पाहिले नाही. गायकवाडने आयपीएल 2021 मध्ये 635 धावांसह ऑरेंज कॅपही जिंकली होती. त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये 52 सामन्यांत 39.07 च्या सरासरीने 1797 धावा केल्या आहेत. तो हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये महाराष्ट्र संघाचा कर्णधारही आहे. अशा परिस्थितीत सीएसकेने भविष्यातील योजना लक्षात घेऊन योग्य निर्णय घेतल्याचे मानले जात आहे. सध्या चेन्नई फ्रँचायझी गायकवाडला एका हंगामासाठी 6 कोटी रुपये देत आहे. तर धोनीला 12 कोटी रुपये मिळत आहेत. अशाप्रकारे गायकवाडची आयपीएलमधील फी धोनीपेक्षा निम्मी आहे.
धोनीने नुकतीच फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली होती आणि सूचित केले होते की तो आता आयपीएल 2024 मध्ये नवीन भूमिकेत दिसू शकतो. त्याच्या या पोस्टने चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढले होते. धोनीने फेसबुक पोस्टमध्ये लिहिले होते की, 'आयपीएलच्या नव्या हंगामाची आणि नव्या भूमिकेची वाट पाहू शकत नाही. संपर्कात राहा!'