पुढारी ऑनलाईन डेस्क : Jasprit Bumrah : आयपीएल 2024 ची चर्चा आतापासूनच रंगली आहे. दरम्यान, एक धक्कादायक बातमी सर्वत्र चर्चेत आहे. ही बातमी आहे मुंबई इंडियन्सचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहची. सोशल मीडियावर तो ट्रेंड करत असून त्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून मुंबई इंडियन्सला अनफॉलो केल्याचे समोर आले आहे.
इंडियन प्रीमियर लीग 2024 (IPL 2024)च्या रिटेंशन प्रक्रियेमधील सर्वात मोठे नाट्य मुंबई इंडियन्स (एमआय) आणि गुजरात टायटन्स (जीटी) या दोन फ्रँचायझींमध्ये नुकतेच घडून गेले. या नाट्याचा केंद्रबिंदू हार्दिक पंड्या हा अष्टपैलू खेळाडू होता. गेल्या दोन आयपीएल हंगामासाठी गुजरातचा कर्णधार म्हणून जबाबदारी यशस्वीरित्या सांभाळणा-या हार्दिकने मुंबई इंडियन्समध्ये घरवापसी करून सर्वांनाच आश्चर्यचकित केले. पण तो परतल्याने एमआयचा वेगवान गोलंदाज बुमराह (Jasprit Bumrah) हा फारसा खूश नसल्याची चर्चा आहे.
वास्तविक, बुमराह हा मुंबई इंडियन्सचा सर्वात अनुभवी आणि मुख्य गोलंदाज आहे. त्याने आपल्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे संघाला अनेकवेळा विजय मिळवून दिला आहे. त्याला फ्रँचायझीने कायम ठेवले आहे. बुमराहने नुकतीच इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यानंतर असा अंदाज लावला जात आहे की हा मेसेज हार्दिक पांड्याच्या मुंबई इंडियन्समध्ये पुनरागमनाबाबत आहे. एवढेच नाही तर बुमराहने मुंबई इंडियन्सला इंस्टाग्रामवर अनफॉलो केले आहे. तर दुसरीकडे तो आरसीबीला फॉलो करत असल्याचे दिसत आहे.
मात्र, टीम इंडियाचा (Team India) हा वेगवान गोलंदाज अजूनही रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि हार्दिक पंड्याला (Hardik Pandya) इन्स्टाग्रामवर फॉलो करत आहे. बुमराहने इंस्टाग्राम स्टोरीवर एक कोट शेअर केला आहे, ज्यामध्ये लिहिले आहे, 'कधीकधी मौन हे सर्वोत्तम उत्तर असते.'
रोहित शर्मा हा सध्या मुंबई इंडियन्सचा कर्णधार आहे. पण त्याच्यानंतर एमआयचा भावी कर्णधार म्हणून बुमराहकडे पाहिले जात होते. परंतु हार्दिक पंड्या परतल्यामुळे त्याचे कर्णधार बनणे अवघड आहे. हार्दिकने आपल्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सला पहिल्याच हंगामात चॅम्पियन बनवले, तर दुसऱ्या हंगामात अंतिम फेरीत पोहोचवले. हार्दिक हा टी-20 फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा कर्णधार आहे, त्यामुळे तो मुंबई इंडियन्सचा भावी कर्णधार होणार हे जवळपास निश्चित दिसते.
पुढील वर्षीच्या आयपीएलमध्ये खेळणाऱ्या सर्व दहा संघांनी त्यांच्या रिटेन आणि रिलिज केलेल्या खेळाडूंची यादी रविवारी जाहीर केली. यादरम्यान, हार्दिक पंड्या पुन्हा एकदा मुंबई इंडियन्समध्ये परतला असल्याचे रिटेनशनच्या दुसऱ्या दिवशी स्पष्ट करण्यात आले आहे.
बुमराहने आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये चांगली कामगिरी केली. मात्र, भारतीय संघाला अंतिम फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. टीम इंडियाचे आणखी एक आयसीसी विश्वचषक जिंकण्याचे स्वप्नही भंगले. मात्र आता भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात टी-20 मालिका खेळली जात आहे. त्यात बुमराहला विश्रांती देण्यात आली आहे.