मुंबई ; वृत्तसंस्था : आयपीएलचा (IPL 2022) पंधरावा हंगाम सुरू झाला असून, यंदा कोणता संघ अजिंक्य ठरणार याची चर्चा पैजा लावून केली जात आहे. या स्पर्धेतील सगळे म्हणजे 74 सामने महाराष्ट्रात खेळवण्यात येणार आहेत. यंदा आयपीएलच्या रचनेतही बदल करण्यात आला आहे. म्हणजेच दहा संघांना दोन गटांमध्ये विभागण्यात आले आहे. खेरीज यावेळी ख्रिस गेल, एबी डिविलियर्स आणि सुरेश रैना यांसारखे दिग्गज खेळाडू आयपीएलमध्ये दिसणार नाहीत. मुख्य मुद्दा आहे तो विजेत्या संघाला किती रक्कम मिळणार? एवढेच नव्हे तर ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप विजेत्या खेळाडूला किती पैसे मिळतात हेही जाणून घेणे औत्सुक्याचे ठरेल.
यंदाच्या आयपीएलमधील (IPL 2022) विजेत्या संघाला 20 कोटी रुपयांचे तर उपविजेत्या संघाला 13 कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. तिसर्या क्रमांकाला 7 कोटी आणि चौथ्या क्रमांकाला 6.5 कोटी रुपये मिळणार आहेत. एमर्जिंग प्लेअरला 20 लाख, सुपर स्ट्रायकरला 15 लाख, ऑरेंज कॅपसाठी 15 लाख आणि पर्पल कॅपसाठीही तेवढेच बक्षीस मिळणार आहे.
पॉवर प्लेअर ऑफ द सिझन, मोस्ट व्हॅल्यूएबल प्लेअर, गेमचेंजर ऑफ द सिझन आणि सर्वाधिक षटकार खेचणारा खेळाडू अशा प्रत्येकाला बारा लाख रुपयांचे घसघशीत बक्षीस देऊन गौरवण्यात येणार आहे.