पुढारी ऑनलाईन : भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतसोबत (Rishabh Pant) हरियाणाच्या एका क्रिकेटपटूने फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या खेळाडूने रिषभला १ कोटी ६३ लाखापेक्षा अधिक रकमेची टोपी घातली आहे. हरियाणाच्या या खेळाडूचे नाव मृणांक सिंग. रिषभ पंत आणि त्याचा मॅनेजर पुनीत सोलंकी यांनी मृणांकविरोधात तक्रार दाखल केली आहे. मृणांकला चालू महिन्याच्या सुरुवातीला पोलिसांनी एका दुसऱ्या प्रकरणात अटक केली आहे. अशातच त्याने पंतसोबत देखील फसवणूक केल्याचे समोर आले आहे.
मिळालेली माहिती अशी की, पंतला फ्रंक मुलर वॅनगार्ड यॉटिंग या सीरिजचे घड्याळ खरेदी करायचे होते आणि त्याने त्यासाठी पंतने मृणांकला ३६ लाख २५, १२० रुपये दिले होते . आणि रिचर्ड मिल ब्रँडचे एक घड्याळ घेण्यासाठी पंतने ६२ लाख, ६० हजार रुपये देखील त्याच्याकडे दिले होते.
मृणांकने चुकीचे रेफरन्स देऊन रिषभ पंतचा (Rishabh Pant) विश्वास जिंकला व त्याच्याकडून महागड्या घड्याळ्यांसाठी १.६३ कोटी रुपये घेतले. हे प्रकरण २०२१ मधील आहे. काही दिवसांपूर्वीच मृणांकला पोलिसांनी एका दुसऱ्याच प्रकरणात अटक केली आहे. साकेत कोर्टाने मागच्या आठवड्यात मुंबईच्या आर्थर रोड जेल मध्ये मृणांकला सादर करण्याची सुचना केली आहे. त्यातही त्याने एका व्यावसायिकाला महागडी घड्याळं आणि मोबाईल स्वस्त दरात देतो असे आमीष दाखवले होते. तो आता मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये आहे.
"जानेवारी २०२१मध्ये मृणांकने महागडी घड्याळं, बॅग्स, दागिने आदी वस्तू खरेदी-विक्री करण्याचा बिझनेस सुरू केल्याचे रिषभ व सोलंकी यांना सांगितले होते. यावेळी मृणांकने अनेक क्रिकेटपटूंचा रेफरन्स त्या दोघांना दिला होता. रिषभ पंत आणि त्याच्या मॅनेजरला या दोघांना चांगल्या सवलतीत व स्वस्त दरात महागडी घड्याळं देणार असल्याचे सांगितले," असे या तक्रारीत नमुद केले आहे. तक्रारीमध्ये घड्याळांच्या किमतीबाबत देखील माहिती दिली गेली आहे.