Latest

हसन मुश्रीफांवरील गुन्ह्याचा तपास सुरू; कागदपत्रांची छाननी

मोहन कारंडे

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यात भागभांडवल देतो, असे सांगून सुमारे 40 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरुद्ध मुरगूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने शनिवारी दिवसभर प्रचंड तणाव होता. मुश्रीफ समर्थक कमालीचे आक्रमक झाले असून त्यांनी ठिय्या मारल्याने मुरगूडला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते. दरम्यान, या आर्थिक स्वरूपाच्या गुन्ह्याच्या तपासासाठी दिवसभर कागदपत्रांची छाननी सुरू होती.

विवेक विनायक कुलकर्णी (रा. कागल) यांनी हसन मुश्रीफ यांच्याविरुद्ध मुरगूड पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, बेलेवाडी काळम्मा (ता. कागल) येथील घोरपडे कारखान्यात 2012 ते आजअखेर या काळात गुन्हा घडला आहे. मुश्रीफ यांनी कारखाना उभारणीसाठी तालुक्यासह परिसरातील ऊस उत्पादक, भागधारकांना केलेल्या आवाहनानुसार प्रत्येकांकडून दहा हजार रुपयाप्रमाणे शेअर भांडवल घेऊन सुमारे 40 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे.

कुलकर्णीसह सभासदांना दरमहा पाच किलो साखर, लाभांश स्वरूपात अन्य आर्थिक लाभ देण्यात येतील, अशी प्रलोभने दाखविण्यात आली होती. कारखाना सुरू झाल्यानंतर बिगर ऊस उत्पादक या सदराखाली साखरेसाठी कार्डे देण्यात आली. विवेक कुलकर्णीसह अन्य लोकांना अधिकृत पावती अथवा शेअर सर्टिफिकेट देण्यास टाळाटाळ करण्यात आली. सरसेनापती शुगर 'एलएलपी' या नावाने पावत्या देण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

नॉन क्युम्युलेटिव्ह व प्रेफन्शियल शेअर्स या नावाखाली पोच पावत्या दिल्या. कारखाना उभारताना रोख व धनादेश स्वरूपात कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कागल येथील शाखा क्रमांक 1 व 2 मधून त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे व्यक्तिगत तसेच सरसेनापती शुगर पब्लिक लिमिटेड या नावाने भाग देतो, असे सांगून पैसे गोळा केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

मुश्रीफ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने शनिवारी दिवसभर कागलसह मुरगूड परिसरात प्रचंड तणाव होता. राष्ट्रवादीच्या संतप्त पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मूरगूड पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केलेे. तणावपूर्ण स्थिती लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी अधिकार्‍यांसह पोलिसांचा मोठा फौजफाटा रवाना केला होता. करवीरचे पोलिस उपअधीक्षक संकेत गोसावी, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक महादेव वाघमोडे, सायबर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय गोर्ले, कागलचे निरीक्षक ईश्वर ओमासे, चंदगडचे पोलिस निरीक्षक संतोष घोळवे, जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक सतीश गुरव यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा दाखल झाला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT