Latest

‘या’ कंपनीत मास्क लावून देतात मुलाखत!

Arun Patil

बीजिंग : आजकाल सरकारी असो अथवा खासगी बहुतेक सर्वच कंपन्या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती अर्थात इंटरव्ह्यू घेतात. यात उमेदवाराची क्षमता तपासली जाते. तसेच उमेदवार त्या नोकरीसाठी योग्य आहे की नाही, तो काम नीट करेल की नाही हेदेखील पाहिले जाते. उमेदवार कंपनीसाठी किती फायदेशीर आहे, त्याचा स्वभाव, चारित्र्य आणि आत्मविश्वास कसा आहे, या गोष्टीदेखील मुलाखतीवेळी पाहिल्या जातात.

जेव्हा आपण मुलाखतीसाठी जातो तेव्हा आपल्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. घाबरून जाऊ नये, आत्मविश्वास चांगला ठेवावा, चांगले दिसणे गरजेचे असल्याने योग्य पेहराव करावा अशा प्रकारचा सल्ला यावेळी लोक आपल्याला देत असतात; पण हे सगळं असताना एका चिनी कंपनीने मुलाखतीसाठी अनोखी पद्धत अवलंबली आहे. या कंपनीत मुलाखतीला मास्क लावून जावे लागते. कारण नोकरीसाठी चेहर्‍यापेक्षा पात्रता महत्त्वाची असते, असे या कंपनीचे मत आहे.

'साउथ चायना मॉर्निंग पोस्ट'च्या वृत्तानुसार, काही दिवसांपूर्वी एका कंपनीने मुलाखती घेतल्या. या मुलाखतींचा व्हिडीओ चीनमधील सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओत, मुलाखतीसाठी आलेल्या सर्व उमेदवारांनी आपला चेहरा मास्कने पूर्णपणे झाकल्याचे दिसते. त्यांच्या चेहर्‍याचा कोणताही भाग दिसत नव्हता. इतकेच नाही तर मुलाखत घेणार्‍या टीममधील प्रत्येक व्यक्तीने देखील पूर्ण चेहर्‍यावर मास्क लावला होता. यावेळी कोणी कॅट मास्क, डॉग मास्क तर कोणी एलियन मास्क परिधान करून आले होते. जेंग नावाच्या महिलेने तीन फेब्रुवारीला हा व्हिडीओ सोशल मीडिया अकाऊंटवर अपलोड केला होता. ज्या लोकांना आपल्या लुक्समुळे भीती वाटते, अशा लोकांना याचा सर्वाधिक फायदा होईल, असे तिने लिहिले होते.चेंगदू अँट लॉजिस्टिक्स या कंपनीने हा व्हिडीओ त्याच्या संस्थेचा असल्याचे मान्य केले आहे.

नवीन मीडिया ऑपरेटर, लाईव्ह-स्ट्रीम ब्रॉडकास्टर आणि डाटा विश्लेषक या पदांसाठी मुलाखती घेण्यात येत होत्या, त्यावेळचा हा व्हिडीओ आहे. आम्ही लोकांच्या क्षमतेवर अधिक लक्ष केंद्रीत करतो. कोण चांगलं दिसतं यापेक्षा चांगलं काम कोण करू शकतं, हे आम्ही तपासतो. उत्तम उमेदवाराची निवड करणे हा आमचा उद्देश आहे, असे कंपनीने म्हटले आहे. या प्रयोगामुळे उमेदवाराला तणाव जाणवत नाही, असा दावा देखील कंपनीने केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT