मॉस्को ; वृत्तसंस्था : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची प्रेमिका असलेल्या एलिना काबेवा ही रशिया-युक्रेन युद्धाची कट्टर समर्थक असून युद्धाच्या पहिल्या दिवसापासून ती पुतीन यांना पाठिंबा देत आहे. पुतीन यांच्या या प्रेमिकेला रशियन सरकार वर्षाला 60 कोटी रुपये पगार देत असल्याची माहिती आहे.
एलिना रसियाच्या नॅशनल मीडिया काऊन्सिलची अध्यक्ष आहे. एकप्रकारे रशियातील सर्व प्रमुख वर्तमानपत्रे आणि टीव्ही चॅनेल्सवर तिचे थेट नियंत्रण आहे. या कामापोटी तिला 60 कोटी रुपये वार्षिक वेतन दिले जाते.
पुतीन यांनी एलिनासोबतचे संबंध लपविण्याचा खूप प्रयत्न केला होता, पण प्रसारमाध्यमांच्या नजरेतून त्यांचे हे अफेयर लपले नाही. एलिना रशियाची सुप्रसिद्ध जिम्नॅस्ट असून तिने जिम्नॅस्टिकमध्ये ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले होते. याशिवाय एलिनाने 14 जागतिक चॅम्पियनशिप आणि 21 युरोपियन चॅम्पियनशिप जिंकल्या आहेत.
2008 मध्ये ती 23 वर्षांची असताना तिचे नाव पुतीन यांच्यासोबत प्रथम जोडले गेले होते. सुरुवातीला दोघांनी हे रिलेशन लपविण्याचा प्रयत्न केला असला तरी नंतर त्यांच्या जवळीकतेचे किस्से जगभरात चर्चेचे ठरले होते. सध्या एलिना 38 वर्षांची असून पुतीन 69 वर्षांचे आहेत.
एलिनाचा पूर्वाश्रमीचा पती पोलिस कर्मचारी होता. व्लादिमीर पुतीन यांच्याशी जवळीक वाढल्यानंतर तिने घटस्फोट घेतला. जिम्नॅस्टिकमधून निवृत्ती घेतल्यानंतर पुतीन यांनी एलिनाला खासदारही केले. यावेळी पुतीनही त्यांची पत्नी ल्यूडमिलापासून विभक्त झाले. त्यानंतरपासून एलिनालाच रशियाची 'फर्स्ट लेडी' मानले जात आहे.