इस्लामाबाद, वृत्तसंस्था : पेशावरमधील पोलिस वसाहतीतील मशिदीत बॉम्बस्फोट घडवून १०० वर पोलिसांचे बळी घेतल्यानंतर कराचीतील पोलिस मुख्यालय काही काळ ताब्यात घेण्यापर्यंत तहरिक-ए-तालिबान पाकिस्तानची (टीटीपी) मजल गेली आहे. वीस दिवसांत दहशतवाद्यांनी पाकिस्तानच्या अंतर्गत सुरक्षेवर केलेला हा दुसरा हल्ला आहे. त्याआधी पेशावर लष्करी मुख्यालयालाही टीटीपीने लक्ष्य केले होते. अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याने आधीच पाकिस्तानची अन्नान्न दशा आहे. त्यात हे हल्ले दुष्काळात तेरावा महिना ठरले आहेत.
काही महिन्यांपूर्वी तालिबानचा दबदबा केवळ खैबर पख्तुनख्वा प्रांतापुरता मर्यादित होता. आता कराचीपर्यंत तालिबानी धडकले आहेत. तालिबानचे काही हितचिंतक लष्करातही असल्याने पाकिस्तानची अण्वस्त्रे दहशतवाद्यांच्या हाती लागण्याचा मोठा धोका आहे.
तालिबानने अफगाणिस्तानातील सत्तेवर कब्जा केल्यानंतर ही संघटना कराचीसारख्या आर्थिक राजधानीतसह पूर्ण देशात पसरली आहे. अतिसुरक्षित म्हणून गणल्या जाणाऱ्या कराचीतील पोलिस मुख्यालय परिसराच्या दहशतवाद्यांनी चिंधड्या उडविल्या आहेत. अफगाणिस्तानातून काढता पाय घेताना अमेरिकन लष्कराने सोडून दिलेली शस्त्रसामग्री तालिबानच्या हाती लागली. ती अफगाणिस्तान तालिबानने पाकिस्तान तालिबानला पुरविलेली आहे.
पाकिस्तानी लष्कराचे इस्लामीकरण झालेले आहे. पाक लष्करानेच तहरिक- ए-तालिबान पाकिस्तान, जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा आणि अल- कायदासारख्या दहशतवादी संघटना देशात उभ्या केल्या. दहशतवादी निर्माण करणारे हजारो मदरसे सुरू केले. जमात-ए-इस्लामी ही संघटना पाकिस्तानमध्ये संपूर्ण शरियती निजाम लागू करण्याच्या जिद्दीने पछाडलेली आहे. चोरीवर हात तोडणे, विवाहबाह्य संबंधावर दगडांनी ठेचून ठार मारणे, अशा शिक्षा या संघटनेला हव्या आहेत.